पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यामध्ये जखमी झालेले सुबोध पाटील आपल्या कामोठे येथील घरी परतले सुखरुप
पनवेल (वार्ताहर)- ः जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंटमधील सुबोध पाटील सपत्नीक सुखरुप घरी परत आले आहेत.त्यावेळी त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले सुबोध पाटील सुखरूपपणे आपल्या कामोठे येथील निवासस्थानी परतले. पहलगाम येथील हल्ल्याबाबत सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक असा अनुभव कथन केला.सुबोध पाटील यांनी सांगितले की, मागून कसला तरी आवाज येत होते,परंतु नेमके काय सुरू आहे, ते कळत नव्हते.तो आवाज सलगपणे सुरूच होता आणि तेथे उपस्थित असलेले लोक सैरावैरा पळत होते. आम्हीही अत्यंत घाबरलो आणि वाट मिळेल, तिथे पळू लागलो.काही अंतर गेल्यावर समोरच काही लोक बसलेले दिसले. त्यामुळे आम्हीही तिथे बसलो. तेवढ्यात एक दहशतवादी तेथे आला आणि म्हणाला की, शतुमच्यापैकी जे हिंदू आहेत,त्यांनी उभे राहा.असे सांगताच त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्यातील गोळ्या मला लागून मी खाली पडलो. शअनेक तासांनी शुद्ध आली, तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडलेले पाहिले.ज्या स्थानिकाने मला त्या बैसरन खोर्यात नेले होते,त्याने मला ओळखले. त्याने मला प्यायला पाणी दिले आणि पाठीवर घेऊन मला तिथून बाहेर काढले. तेथून बाइकवरून खाली घेऊन आला. लष्कराच्या जवानांनी माझ्यावर प्राथमिक उपचार केले आणि रुग्णालयात दाखल केले. तिथून मला हेलिकॉप्टरने लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.तिथे सात दिवस माझ्यावर उपचार सुरू होते, असे सुबोध पाटील यांनी सांगितले.
Post a Comment