कार्यकर्तेच सांगतील,त्या आधारेच पुढील वाटचालीची दिशा .... मी आजही शेकापक्षातच - मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे ... शेकापकडून कार्यक्रमांना डावळलत असल्याची खंत
पनवेल (संजय कदम) ः आजही मी शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे,परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट मत आज मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या भगरच्च पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
गेली ४८वर्षे मी राजकारणात असून शेकापक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे.पक्षाने जी-जी जबाबदारी माझ्या टाकली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे,असे असतानाही नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उरण मतदारसंघातून माझा मुलगा प्रितम हा उभा असताना त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने काम केले आहे.त्यामुळे निसटता पराभव आमचा झाला.याबाबत मी माझी स्पष्ट भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडून आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू या असे वारंवार सांगितले.परंतु त्यांना आजही महाविकास आघाडीमध्येच रहायचे असल्याने मी या महाविकास आघाडीतून माझ्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडत आहे. शेकापचे भाई जयंत पाटील यांच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला.पनवेल मतदारसंघातून बाळाराम पाटील हे उमेदवार म्हणून मशाल चिन्हावर लढण्याचे निश्चित होवून फॉर्म भरत असताना तो फॉर्म मागे घेण्यास सांगण्यात आले व त्या बदल्यात शिवसेनेने उमेदवार दिला.माझ्या मुलाच्या बाबतीतही अशाच प्रकारचे राजकारण महाविकास आघाडीकडून करण्यात आले.
या वारंवार घडणार्या घटनेमुळे मी व्यथित झालो असून आम्हाला बेरजेचे राजकारण करायचे आहे पक्ष वाढवायचा आहे परंतु काही पक्षातील पुढार्यांची मते भिन्न आहेत,त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे दिसत नाही आहे.अशावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे हे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते व तसा मी निर्णय माझ्या पक्षश्रेष्ठींची भेट घेवून त्यांना कळविले आहे.मी हा निर्णय घेतल्यावरच पक्षाने सुद्धा माझ्या विरोधात वेगळी भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.
नुकतेच शेकापक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर झाले,परंतु तेथे मला बोलाविण्यात आले नाही.तरी मी प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने दुपारी पुजेला पाया पडायला गेलो.त्याचप्रमाणे आजपासून पक्षाच्या बैठका सुरू झाल्या आहेत.त्या बैठकीचे निमंत्रण सुद्धा मला देण्यात आलेले नाही.त्यातूनच माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत शेकापक्षाची वेगळी भूमिका दिसून येत असल्यानेच मी सोमवारी पनवेल,उरण व खालापूर मतदारसंघातील माझ्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बैठक लावली असून पुढील निर्णय काय घ्यायचा हे कार्यकर्तेच सांगतील.त्या आधारेच आमची पुढील वाटचालीची दिशा ठरेल.
आम्ही पूर्वीपासून व्यावसायिक आहोत आमचे किराणा दुकान होते. त्यामुळे लोकांना मी कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी दुसरा पक्षात चाललो असा समज झाला आहे,परंतु आजही माझ्याकडे मोठ्या प्रमाणात काम असून मी अपक्ष राहिलो तरी माझे काम थांबणार नाही.त्यामुळे खोट्या अफवा पसरविणे थांबवावे व कार्यकर्त्यांचा निर्णय हा अंतिम असेल व त्यांच्याच आधारे आम्ही योग्य पाऊले उचलू,असेही यावेळी जे.एम.म्हात्रे यांनी सांगितले.
Post a Comment