प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई - लोकनेते रामशेठ ठाकूर .... कोपरच्या पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाई केल्यास जन आंदोलनाचा इशारा
पनवेल(प्रतिनिधी) - सिडकोने कोपर गावातील पारंपारिक स्मशानभूमीवर तोडक कारवाईची टांगती तलवार आणली आहे.मात्र ही केवळ कोपर ग्रामस्थांच्या स्मशानभूमीची समस्या राहिली नसून सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.सिडको वारंवार भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत आहे हे खपवून घेतले जाणार नाही.लोकनेते दिबासाहेबांनी कणखर भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवले.त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल,असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला.
पनवेल तालुक्यातील कोपर (गव्हाण) येथील शेकडो वर्षांपूर्वीच्या पारंपारिक स्मशानभूमीवर सिडको तोडक कारवाई करणार असल्याचे समजताच या कारवाईला विरोध करण्यासाठी कोपरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले. यावेळी कारवाईला कडाडून विरोध करताना लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.यावेळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सिडकोसमवेत बैठक लावण्यासंदर्भात उलवे पोलिस ठाण्यावर पायी मोर्चा काढून निवेदनही देण्यात आले. तसेच उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या असहकार्याच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.स्मशानभूमीबाबत ठोस उपाययोजना न केल्यास सिडको, पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय व वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही ठिय्या मांडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी सिडकोविरोधात घोषणा देत स्मशानभूमीच्या कारवाईला आणि स्थलांतरित जागेला तीव्र विरोध दर्शविला. याप्रसंगी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत,जितेंद्र म्हात्रे,भार्गव ठाकूर,सचिन घरत,रत्नप्रभा घरत, विजय घरत, किशोर पाटील,वामन म्हात्रे,मनोज घरत, साईचरण म्हात्रे, वैभव घरत यांच्यासह कोपर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, कोपरची स्मशानभूमी सिडकोने २००६ साली बांधली. २०२० साली स्मशानभूमी भोवती कंपाउंड वॉल बांधण्यासाठी सिडकोने टेंडर काढले आणि आता सिडको स्मशानभूमीवर तोडक कारवाई करू पाहते.त्यामुळे सिडको वारंवार भूमिका बदलत असून प्रकल्पग्रस्तांबाबत दुटप्पी धोरण लादत आहे. येथील वसाहतींना स्मशानभूमीचा त्रास होत असल्याचे सांगत सिडको स्मशानभूमीवर कारवाई करणार असल्याचे सांगते. मात्र याठिकाणी वसाहती नंतर उभ्या राहिल्या असून स्थानिक भूमिपुत्र-प्रकल्पग्रस्तांची स्मशानभूमी परंपरागत अस्तित्वात आहे हे ध्यानात ठेवावे.येथून स्मशानभूमी हटवल्यास गोरगरीब, वयोवृद्ध नागरिकांना अंत्यविधीसाठी अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल याची सिडकोला बिलकुल जाण नाही.
ते पुढे म्हणाले, सिडकोने ९५ गावांची जमीन संपादित केली. मात्र अद्यापही या सर्व गावांच्या स्मशानभूमींचा प्रश्न सोडवलेला नाही.त्यामुळे नवीन स्मशानभूमी बांधताना गावातील पारंपारिक जुन्या स्मशानभूमींवर कारवाई करून चालणार नाही.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदर्श सरकार कार्यरत आहे.त्यामुळे सिडकोने नागरिकांवर अन्याय करू नये. प्रकल्पग्रस्तांच्या या समस्येबाबत आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर या दोघांनीही जातीने लक्ष घालावे, अशीही सूचना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली.
प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय विरोधात सिडकोविरोधात लढाई पुकारल्यास कल्याण,ठाणे,डोंबिवली,नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त देखील सामिल होतील.प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.आपल्याला आपले हक्क भांडूनच मिळवावे लागतील.सुरुवातीला यासाठी पनवेल व उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांची मजबूत संघटना गठीत करण्यात येईल.कोपरच्या स्मशानभूमीतून या जनआंदोलनाची ही केवळ ठिणगी पेटली आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवायचे असतील तर खऱ्या अर्थाने पेटून उठावे लागेल,असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे म्हणाले कि, प्रकल्पग्रस्तांची ही लढाई लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत.सिडकोचा उलवे नोड अत्यंत संवेदनशील असून सिडको कोणाच्याही घरावर कारवाई करते, स्थानिकांना सोयीसुविधा देत नाही.त्यामुळे याविरोधात आपली एकजूट महत्वाची आहे.स्मशानभूमीची जमीन वेटलँड क्षेत्रात येत असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. परंतु या स्मशानभूमीलगतच्या वेटलँड भूखंडांवर टोलेजंग वसाहती उभ्या राहिल्या आहेत हे सिडकोला दिसत नाही का? या विरोधात आम्ही नक्कीच आंदोलन छेडू.सिडको प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेत नाही,तर हुकूमशाही पद्धतीने कारवाई करते. या हुकूमशाही विरोधात आपण एकजुटीने उभे राहून विरोध करून सडेतोड उत्तर देऊया,असे आवाहनही जे.एम.म्हात्रे यांनी केले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत,माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे,माजी सरपंच रत्नप्रभाताई घरत आदींनीही मनोगत व्यक्त केले.
Post a Comment