तळोजा येथे बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये आढळल्याने खळबळ
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः तळोजा देवीचा पाडा येथील 2 वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह राहत्या घरात सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.27) समोर आला आहे.हार्षिक अमलेश शर्मा (वय 2, रा. तळोजा देवीचा पाडा) असे मृत मुलीचे नाव असून ती मंगळवारपासून (दि.25) बेपत्ता होती.या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तळोजा पोलिसासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास करत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,मृत मुलगी तिच्या आई वडिलांसह देवीचा पाडा येथे राहत होती.ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलिस ठाण्यात दिली होती.दरम्यान,आज तिचा मृतदेह राहत्या घरात बाथरूमवरील पोटमाळ्यावरील सुटकेसमध्ये ठेवल्याचे आढळून आले.पोट माळ्यावरून वास येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.हरवलेल्या मुलीचा मृतदेह घरातच आढळल्याने आई वडिलांना धक्का बसला आहे.
Post a Comment