एका दिवसात मिळणार दाखले ... अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची माहिती
पनवेल (वार्ताहर): - पनवेल तहसीलच्या सेतू केंद्रात शासनाने निर्देशित केलेले कागदपत्र जमा केल्यावर एका दिवसात अधिवास, उत्पन्न आणि जेष्ठ नागरिकत्व असे तीन दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पनवेलचे अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी ही माहिती दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून हा उपक्रम पनवेल तहसील कचेरीच्या नव्या इमारतीमध्ये राबविला जात आहे. ४०० दाखले एका दिवसात देण्यात आले आहेत.राज्य शासनाने १०० दिवसांच्या काळात सात कलमी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या सूचना शासनाच्या प्रत्येक कार्यालयाला दिल्या आहेत, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत पनवेल तहसील कार्यालयाला सूचना दिल्यानंतर अप्पर तहसीलदार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संभाजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात दाखला वितरण हा उपक्रम राबविला. दाखल्यांना लागणारे पुराव्याची कागदपत्र व्यवस्थित द्यावी याच कागदपत्रांची तपासणी केल्यावरच दाखल्यांचे वाटप केले जात आहे. एका दिवसात दाखला वितरणासोबत जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर यांसारखे दाखले सात दिवसांत नागरिकांना सेतू केंद्रातून देण्याच्या सूचना अप्पर तहसीलदार इंगळे यांनी दिल्या आहेत. पनवेल तालुक्यातील १०५ गावांसाठी अप्पर तहसीलदार यांचे कार्यालय नवीन इमारतीमध्ये सुरू आहे.
Post a Comment