कळंबोली मॅकडॉनल्ड् समोर टेम्पोची बसला जोरदार धडक ...वाहनात अडकून टेम्पो चालक जागीच ठार; बसमधील प्रवासी सुखरूप
पनवेल (वार्ताहर) ः कळंबोलीहद्दीत असलेल्या मॅकडॉनल्ड्समोर भीषण अपघाताची घटना आज घडली आहे.हा अपघात इतका दुर्दैवी होता की यात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.पुण्याहून मुंबईकडे जाणारी बस क्रमांक एमएच-14-केक्यू-5925 फ्लायओव्हर जवळ आली असता मागून भरधाव वेगात येणार्या टेम्पो क्रमांक एमएच-46-सीएल-7064 याने बसला जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की,टेम्पो चालक टेम्पोमध्येच अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.या अपघाताचा पुढील तपास कामोठे पोलिसांमार्फत सुरू आहे घटनास्थळी कळंबोली वाहतूक पोलिसांमार्फत वाहतुकीचे नियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान कळंबोली मॅकडोनाल्डजवळील बस स्थानकावरून लांब पल्ल्याची एसटी सेवा सुरू आहे.याच ठिकाणी लालपरी, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध या गाड्या धावतात. मात्र खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी बस स्थानकाला लागूनच आपला व्यवसाय थाटलाय. यामुळे अवैध वाहतुकीमुळे अनेक अपघातांचे प्रकार घडले आहेत. नियमानुसार एसटीच्या तांब्यापासून 200 मीटर अंतरापर्यंत खाजगी वाहतुकीची परवानगी नाही,असे असतानाही खाजगी ट्रॅव्हल्सकडून येथे दमदाटी आणि गर्दी करण्यात येते. या संदर्भात अनेक तक्रारी वाहतूक पोलीस तसेच आरटीओकडे दिल्या गेल्या आहेत.यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Post a Comment