पनवेल महापालिकेच्या विभाग प्रमुखांच्या बैठकित जलदगतीने कामे करण्याच्या सूचना .... पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार बसू नये याची खबरदारी घेण्याबाबत सूचना
पनवेल- पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा विभागवार आढावा दिनांक 20 जानेवारी रोजी मुख्यालयात झालेल्या बैठकित प्रशासक तथा आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी घेतला.यावेळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे ,उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते,उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे , लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपमुख्य लेखापरिक्षक संदिप खुरपे, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक अधिकारी स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण सर्व विभाग प्रमुख ,अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालिका हद्दीतील मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृह उभारण्याबाबत अंदाजपत्रक तयार करणे.महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमी अत्याधुनिक करणेस्तव नियोजन करणेबाबत बांधकाम विभागस सूचित करण्यात आलेत.याबरोबरच तीन ठिकाणी शाळा बांधणेस्तव अंदाजपत्र तयार करणे,पार्किंग स्थळे व वाहनांची क्षमता लक्षात घेऊन शुल्क आकारणीबाबत पॉलिसी तयार करणे. अशा विविध बांधकाम विभागाशी संबधित कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
स्काय वॉकवर सोलर पॅनल बसविणे व महापालिका हद्दीत कोठेही वीज चोरी होत नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत विद्युत विभागास आयुक्तांनी सूचित केले.
अल्पसंख्यांक समाजासाठी विविध ठिकाणी दफनभूमी तयार करणेस्तव जागा निश्चित करणे.आदिवासी बांधवांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करणे.आसुडगाव प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत भूखंडाबाबत पाठपुरावा करणेबाबत नगर रचना विभागास आयुक्तांनी सूचित केले.
महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी शौचालय उभारणेस्तव नियोजन करणे, कळंबोली स्टील मार्केट येथे अत्याधुनिक शौचालय उभारणेस्तव नियोजन करण्याबाबत आरोग्य विभागास आयुक्तांनी सूचित केले.तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये धुळप्रदुषण करिता एअर मॉनिटर बसविणेबाबत कामाचा आढावा आयुक्तांनी घेतला.
पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार बसू नये याची खबरदारी घेण्याबाबत आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्याना सूचित केले. फेरीवाला व्यवसाय धारकाची नोंदणी व त्यांना परवाना देणेबाबत संबधित विभागास सूचित करण्यात आले. सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी अनधिकृत होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनरवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत कोकण विभागास्तरीय स्पर्धांमध्ये पनवेल महानगरपालिकेने मिळवलेल्या यशाबद्दल संबधित अधिकाऱ्यांचे आयुक्तांनी अभिनंदन केले.
Post a Comment