१ लाखाच्या बदल्यात ५ लाख रुपये देतो असे सांगून दिड लाखांची फसवणूक .. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः एक लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देतो अशी खोटी जाहिरात करून दिड लाख रुपये घेऊन त्या बदल्यात बनावट नोटा देऊन फसवणूक केल्या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पवन सरोजकर हा उल्हासनगर, कल्याण येथे राहत असून वाहन चालक म्हणून नोकरी करतो. त्याला मोबाईलवर जाहिरात दिसली. यावेळी एक लाख रुपयाला पाच लाख रुपये मिळणार असल्याबाबतची जाहिरात होती. त्याने व्हिडिओमध्ये असणार्या मोबाईलवर फोन केला असता समोरील इसमाने त्याचे नाव विशाल असे सांगितले. यावेळी पवन दीड लाख गुंतवणूक तयार झाला. त्याने फोनवरून कुठे यायचे याबाबत विशालला विचारणा केली. यावेळी दुसरा मोबाईल क्रमांक देऊन फोन करण्यास सांगितले. त्या फोनवर फोन केला असता समोरील इसमाने त्याचे नाव माणिक शाह असे सांगून पनवेल बस स्टॉप येथे येण्यास सांगितले. त्यानंतर पवन व त्याची पत्नी काजल हे मोटरसायकल घेऊन उल्हासनगर येथून पनवेल बस स्टॉप येथे आले. त्यानंतर माणिक शहा यांनी त्यांना ओरियन मॉल पनवेल येथे येण्यास सांगितले. पत्नीला बस स्टॉप ला थांबवून पवन ओरियन मॉल येथे गेले. यावेळी एका इसमाने माणिक शहा यांनी पाठवले असल्याचे सांगून ओरियन मॉलच्या मागील बाजूस घेऊन गेला. त्यावेळी त्याचा एक मित्र पांढर्या रंगाची एक्टिवा गाडी घेऊन आला. त्यात एक बॅग होती ती बॅग उघडून दाखवली. त्यातील बंडल काढून पाचशेची नोट पवनच्या हातात दिली.ती नोट खरी असल्याने पवन याने दीड लाख रुपये त्याच्याकडे दिले. त्यानंतर त्या इसमाने बॅगेतील पैशांचे बंडल काढून पवनच्या पिशवीत टाकले. काही वेळाने ते दोघेही ऍक्टिवा मोटरसायकलवर बसून निघून गेले. पवनने पैसे तपासून पाहिले असता प्रत्येक बंडलला वर खाली एक नोट खरी बाकी नोटा नकली असल्याचे दिसून आले. माणिक शहाला फोन करून विचारणा केली असता त्याने ठाणे येथे येण्यास सांगून पैसे परत देतो असे सांगितले. पवन ठाणे येथे गेल्यानंतर माणिक यांनी उद्या पैसे देतो असे सांगितले आणि पवन याची फसवणूक केली.
Post a Comment