News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कार्यालयीन कामकाज गतिमान होण्यासाठी पनवेल महापालिकेत ई-ऑफीस प्रणाली ...येत्या दहा दिवसात कार्यप्रणालीची प्रत्यक्षात सुरूवात होणार

कार्यालयीन कामकाज गतिमान होण्यासाठी पनवेल महापालिकेत ई-ऑफीस प्रणाली ...येत्या दहा दिवसात कार्यप्रणालीची प्रत्यक्षात सुरूवात होणार

पनवेल,दि.28 : शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी ई- ऑफिस अंमलबजावणी करण्याबाबत मानक कार्यपद्धती  शासनाच्यावतीने सुचित करण्यात आली आहे .त्यानुसार पनवेल महानगरपालिकेतील कार्यालयीन कामकाजाकरीता आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार ई- ऑफिस साफ्टवेअर प्रणालीचा वापर महापालिकेतील विविध विभागासाठी तसेच महानगरपालिका हद्दीतील वॉर्ड ऑफिसेसमध्ये करण्याच्या दृष्टीने  दिनांक 27 नोव्हेंबर बुधवार रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एनआयसी सेंटरच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. 

या प्रशिक्षणप्रसंगी उपायुक्त कैलास गावडे यांनी आपल्या प्रस्तावनेत ई- ऑफिस साफ्टवेअर प्रणलीचे स्वरूप व महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने कार्यालयीन कामकाज ई ऑफीसद्वारे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानूसार आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यापासून प्रयत्न सुरू करून सगळा डाटा गोळा करून ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. याचा दुसरा भाग म्हणजे प्रशिक्षणास आता सुरूवात झाली आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिकेचे उपायुक्त डॉ.वैभव विधाते , उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर ,मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा प्रशिक्षक  निलेश नलावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शहर अभियंता संजय कटेकर, लेखा अधिकारी संग्राम ऱ्होरकाटे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, विविध विभागातील सर्व अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ई –ऑफीस सॉफटवेअर विनामुल्य पुरविण्यात आले असून  एनआयसी संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत ही प्रणाली राबविण्यात येत आहे.  एनआयसी संस्थेच्या प्रकल्प समन्वयक लक्ष्मीकांत गर्जे व सुरेश सुरा यांनी यावेळी  ई –ऑफीस प्रणालीमधील विविध घटक त्यांचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती दिली. 

कार्यालयात चालणारे कागदोपत्री  कामकाज सोप्यारितीने व जलदगतीने होण्याकरीता आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी ई- ऑफिस साफ्टवेअर प्रणाली महापालिकेत राबविली जावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानूसार ही येत्या दहा दिवसात या कार्यप्रणालीची प्रत्यक्षात सुरूवात महापालिकेत केली जाणार आहे.

या प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या कागदपत्रांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यामुळे कागदपत्रे, फाईल गहाळ होण्याची समस्या उद्भवणार नाही. कार्यालयातील फाईल्स ह्या डिजीटल स्वरूपात झाल्यास कामकाज जलदरित्या होण्यास मदत होणार आहे.  या अनुषंगाने एनआयसी या संस्थेस संबंधित प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी नियुक्त करण्यात आले असून यावेळी प्राथमिक स्तरावरती महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ई –ऑफीस कार्यप्रणालीची  प्रत्यक्षात सुरूवात झाल्यावर महापालिकेतील प्रत्येक विभागांना याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली बंधनकारक असून नागरिकांसाठी देखील ही प्रणाली  लाभदायक ठरणार आहे.


ई-ऑफीस प्रणालीचे फायदे
1. पेपरलेस लोकाभिमुख प्रशासन, गतिमानता व पारदर्शकता वाढेल.
2. नस्ती  (फाईल)व्यवस्थापन प्रणाली अद्यावत होईल.
3. ई ऑफीसमुळे दस्त ऐवजांचे व्यवस्थापन,ट्रँकिंग सहज करता येईल.
4. वर्क फ्रॉम ऐनीव्हेअर : कोठूनही व्हर्च्युअलपणे कार्यालयातील काम करता येईल.
5. ही प्रणाली एक डॅशबोर्ड सुविधा प्रदान करते जी  नस्ती(फाईल) संदर्भातील प्रलंबित असलेले आणि प्रक्रिया केलेले आणि बंद सारख्या स्थितीचे निरीक्षण करण्यास सक्षम आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment