जय भीमचा बुलंद आवाज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी - केंद्रीय मंत्री रामदास आठवले ....आमदार प्रशांत ठाकूर करीत नाही काम खोटे,म्हणून त्यांना निवडून देणार आहे कामोठे- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
पनवेल(प्रतिनिधी) - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत,असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी कामोठे येथे महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना केले.भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या सभेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर,भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रभाकर कांबळे, विजय पवार,डॉ.विजय मोरे,दलित पँथरचे बाळासाहेब पडवळ,भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत,ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख,प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील,भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार,चारुशीला घरत,माजी महापौर डॉ. कविता चौतमोल,पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी त्याचप्रमाणे सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता करताना,आमदार प्रशांत ठाकूर करीत नाही काम खोटे,म्हणून त्यांना निवडून देणार आहे कामोठे, मला अनेक वेळा वाटे चौथ्यांदा प्रशांतजींना निवडून देणार आहे पनवेल आणि कामोठे,असे सांगून या निवडणुकीत आम्ही सर्वजण मैदानात उतरलो आहोत.रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या मागे आहे.जय भीमचा बुलंद आवाज प्रशांतजींच्या पाठीशी उभा आहे, असे सांगितले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, देश कसा पुढे घेऊन जायचा हे शिकवले.समाजापेक्षा देश मोठा असल्याचे सांगितले. देशावर जेव्हा वेळ येईल तेव्हा जात,धर्म बाजूला ठेवा असे शिकवले.आमचा प्राण गेला तरी चालेल,पण आम्ही देशासाठी लढणारे लोक आहोत. आज बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान कोणीही बदलू शकणार नाही.राहुल गांधी खोटा प्रचार करतात, म्हणून त्यांचा निवडणुकीत तोटा होतो.खरे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला माथा टेकून शपथ घेतात. त्यामुळे ते संविधान बदलणे शक्य नाही.त्यांच्या सभेत ते अर्धे भाषण संविधानावर करतात.बाबासाहेबांबद्दल प्रचंड आदर ठेवणारी त्यांची भूमिका आहे,असे केंद्रीय मंत्री आठवले यांनी आवर्जून सांगितले.
ओबीसी समाजातील पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांना खाली खेचण्यासाठी सगळे एकत्र आले आहेत, पण हा पठ्ठ्या त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. माझा समाज हा भोळा आहे,पण शिकलेला आहे. कोणाला निवडून द्यायचे व कोणाला पाडायचे त्यांना चांगले माहिती आहे.या ठिकाणी शेकापचा उमेदवार पडणार असून आमदार प्रशांत निवडून येण्याचा इतिहास पुन्हा घडणार असल्याचे ना.आठवले यांनी नमूद केले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रामशेठ ठाकूर यांच्यासोबत असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे त्यांनी मला सातत्याने आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमदारकीला २००९ मध्ये उभा राहिल्यापासून त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारून केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे.त्यांचासारखा नेता पाठीशी असणे ही माझ्यासाठी कौतुकाची, गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देशात रूजवण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले अविरत कष्ट करीत आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवत असताना तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद मिळावा.१४ तारखेला खारघरला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यामुळे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत,असेही आमदार प्रशांत ठाकूर नम्रपणे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचीही समयोचित भाषणे झाली.प्रास्ताविक भाजप जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार यांनी केले.
Post a Comment