वेडींग प्लॅन करण्याच्या बहाण्याने नववधु असलेल्या महिला वकिलाला गंडा ... शहर पोलीस ठाण्यात तक्रार
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः गोवा येथील हॉटेलमध्ये वेडींग प्लॅन करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेने नववधु असलेल्या वकील तरुणीकडून 4 लाख रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. मिनाक्षी भालेराव उर्फ मिनाक्षी जाधव असे महिला वकीलाची फसवणूक करणार्या महिलेचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान,आरोपी महिलेने अशाच पध्दतीने अनेकांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.सदर प्रकरणातील तक्रारदार तरुणी व्यवसायाने वकील असून मार्च महिन्यामध्ये तिचा विवाह ठरला होता. वकील तरुणीच्या आई-वडिलांनी तिचे लग्न गोवा येथे करण्याचे निश्चित केल्यानंतर ती आणि तिचा होणारा पती या दोघांनी गोवा वेडींग प्लॅनर शोध सुरु केला होता. यादरम्यान वकील तरुणीच्या आई- वडिलांच्या संपर्कात असलेल्या मिनाक्षी भालेराव उर्फ मिनाक्षी जाधव हिच्याकडे त्यांनी डेस्टीनेशन वेडिंगकरिता वेडींग प्लॅनरची चौकशी केली. त्यावेळी मिनाक्षी हिने ती स्वत: वेडींग प्लॅन करत असल्याचे तसेच गोव्यामध्ये तिचे अनेक हॉटेलमध्ये संपर्क असल्याचे सांगितले. तसेच त्यांना कमीत कमी पैशात गोवा येथे वेडींग प्लॅन करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मिनाक्षीने वकील तरुणीला आणि तिच्या होणार्या पतीला अनेक हॉटेलची माहिती देऊन त्याचे रेटकार्ड सुध्दा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. मे महिन्यामध्ये मिनाक्षी हॉटेल बघण्याच्या बहाण्याने कुटुंबासह गोवा येथील प्लॅनेट हॉलीवुड हॉटेलमध्ये गेली होती. तेथून व्हिडीओ कॉल करुन तिने वकील तरुणीच्या आईला हॉटेल दाखवले. तसेच 12 लाख रुपयांमध्ये 2 दिवसासाठी सदर हॉटेल मिळत असल्याचे सांगून त्यांना लवकरात लवकर बुक करण्यास सांगितले. तसेच 4 लाख रुपये अॅडव्हॉन्स देण्याची मागणी केली. यावेळी मिनाक्षीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वकील तरुणीने तिला प्रथम 2 लाख आणि नंतर 1.67 लाख रुपये पाठवून दिले. त्यांनतर मिनाक्षीने वकील तरुणीचे फोन घेण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे वकील तरुणीने संशयावरुन गोवा येथील प्लॅनेट हॉलीडे हॉटेलमध्ये संपर्क साधून तिच्या लग्नाच्या बुकींगबाबत चौकशी केली.
त्यावेळी त्यांच्याकडे बुकींग झाली नसल्याचे तसेच अॅडव्हान्स सुध्दा दिले नसल्याचे हॉटेलकडून सांगण्यात आले. त्यानंतर मिनाक्षी हिने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर वकील तरुणीने मिनाक्षीकडे त्याबाबत जाब विचारला असता, तिने आपली चुक कबूल करुन त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. तसेच जुलै महिन्यात 5 हजार रुपये परत केले. मात्र, त्यानंतर मिनाक्षीने उर्वरीत पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली.अखेर या वकील तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Post a Comment