पनवेल आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर,प्रलंबित मागण्या अंमलबजावणीची मागणी
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.या संपाचे प्रमुख कारण म्हणजे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्वपूर्ण मागण्यांची अंमलबजावणी न होणे.आरटीओ पनवेल विभागाच्या कर्मचार्यांनी सांगितले की, 2022 मध्ये मंजूर झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागांच्या नवीन आकृतीबंधाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या आकृतीबंधानुसार कर्मचार्यांच्या तात्काळ पदोन्नत्या दिल्या जाण्याची मागणी करण्यात येत आहे.याशिवाय, सेवा प्रवेशाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी देखील आहे.कर्मचार्यांच्या इतर प्रमुख मागण्यांमध्ये पनवेल आणि ठाणे विभाग महसूल क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचे सुचवण्यात आले आहे, तसेच कनिष्ठ लेखापरीक्षक पदाच्या निरस्तीकरणानंतर त्यांना कार्यालय अधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात यावी,अशी मागणी आहे.
रत्नागिरी, पेण आणि सिंधुदुर्ग कार्यालयांतील निलंबन मागे घेऊन संबंधित कर्मचार्यांना वाहन 4.0 आणि सारथी 4.0 प्रणालीचे लॉगिन तात्काळ देण्यात यावे, तसेच वेतन निश्चितीतील त्रुटी दूर कराव्यात, अशा मागण्याही समोर आल्या आहेत. पनवेल आरटीओ कार्यालयातील कर्मचार्यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ. का.) सचिन विधाते यांना या संदर्भात निवेदन दिले आहे.या बेमुदत संपामुळे पनवेलसह राज्यभरातील परिवहन सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
Post a Comment