पनवेल महानगरपालिकेच्यावतीने "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात .. महानगरपालिका कार्यक्षेत्रात पाच ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन
पनवेल 'राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयअन्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यक्षेत्रात पाच ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र भगिनींनी या योजनेचा लाभ असे आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लाभार्थी भगिनींनी सदर योजनेचा लाभ मिळण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेच्यावतीने महिला बाल कल्याण विभागातर्फे पाच प्रभाग समिती निहाय विशेष शिबीर /कॅम्पचे नियोजन करण्यात आले आहे. हे विशेष शिबिर दिनांक ८,९ ,१० जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात घेतले जाणार आहेत. तसेच ११ जुलैपासून ३१ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभाग कार्यालयात या योजनेंतर्गत अर्ज भरण्यात येणार नाही.
आजपासून प्रत्येक प्रभाग समिती मध्ये अंगणवाडी सेविका, महापालिकेचे कर्मचारी तसेचआरोग्य विभागामार्फत परिचारक असे एकूण १५० मदतनीस कार्यरत असणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभाग समिती निहाय 5 ऑटो रिक्षाद्वारे योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तसेच शिबिराची प्रसिद्धी करण्यात येत आहे.
आयुक्तांच्या सूचनेनुसार “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेच्या प्रचार व प्रसिद्धसाठी शहरातील विविध ठिकाणी होर्डिंग्ज व १०० ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. याचबरोबर दहा हजार पॅम्प्लेट्सचे वाटप करण्यात येत आहे. तसेच पथनाट्याद्वारेही प्रत्येक प्रभाग समिती मध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
पाच ठिकाणी विशेष शिबिराची दिनांक ८,९ ,१० जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात घेतले जाणार आहेत.
पनवेल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि रोहिदास वडा समाज मंदिर
खारघर -खारघर प्रभाग समितीमध्ये टॅक्स ऑफिस, प्राईड सोसायटी( सेक्टर -7)
कळंबोली प्रभाग समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (रोडपाली)
कामोठे- प्रभाग समितीमध्ये कम्युनिटी हॉल, सेक्टर 21
नावडे- नावडे उपविभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
फेज 2
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु. १५००/- इतकी रक्कम दिली जाईल.
योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
पात्रता
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
Post a Comment