मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक करणाऱ्या पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला ब्रेक
पनवेल- मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक करणाऱ्या पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला ब्रेक लागला आहे.
मार्च अखेरीस जास्तीत-जास्त करवसुली करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या पनवेल महापालिकेचा लोकसभा निवडणुकीच्या काळात करवसुलीचा आक्रमक बाणा म्यान झाला आहे.मालमत्ता करावरून नाराज असलेल्या पनवेलच्या मतदारांना मालमत्ता कराची आठवण होवू नये याची काळजी प्रशासन घेते आहे काय अशी शंका यामुळे उपस्थित झालेली आहे.प्रशासनाने मात्र करवसुलीची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला आहे.
मार्च २०२४ पर्यंत चालू आर्थिक वर्षांत पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराची तब्बल ३५५ कोटी रूपयांची वसुली झाली. जास्तीत जास्त करवसुली व्हावी म्हणून पनवेल महापालिकेने बड्या करबुडव्या मालमत्ताधारकांची नावे प्रसिध्द करून दबाव आणला होता. मालमत्ता जप्त करून लिलावाच्या माध्यमातून करवसुली करू असा इशारा करविभागाने दिला होता. कर वसुलीसाठी नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना घेवून वेगवेगळी पथके व्यवसायिक,बडे करदाते आदींवर दबाव आणत होते.१ लाखांपेक्षा जास्त कर थकित असलेल्या ३०० पेक्षा जास्त करदात्यांना नोटीस देवून वसुली केली जात होती.मार्च महिना संपल्यानंतर पालिकेच्या करवसुलीला ब्रेक लागला आहे.
एप्रिल महिन्याच्या मध्यावर्तीपर्यंत नव्या आर्थिक वर्षांची देयके देखील तांत्रिक कारण सांगून काढण्यात आली नव्हती.मे महिना उजाडला तरी देयकांचे वाटप सुरू असल्याचे कारण सांगून मालमत्ता वसुलीचा उत्साह मावळला आहे.पनवेल महापालिका प्रशासनाची ही भूमिका लोकसभा निवडणूकीमुळे सौम्य नव्हे तर पूर्णपणे शांत झाली आहे.निवडणुकीच्या काळात मतदार मालमत्ता करावरून नाराज झाल्यास सत्ताधाऱी पक्षाला याचा फटका बसेल.मालमत्ता करावरून आंदोलन करणाऱ्या विरोधकांच्या पाठिशी मतदार जावू शकतो म्हणून मालमत्ता वसुलीचा आक्रमक बाणा प्रशासनाने म्यान करण्यामागे असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात निवासी,व्यवसायिक असे सुमारे साडेतीन लाख मालमत्ता धारक आहेत. मार्च महिन्यात जबरदस्तीने करवसुली केली जात असल्याचे प्रकार समोर आले होते. परंतू लोकसभेची निवडणूक जाहिर झाल्यानंतर करवसुलीचे काम ठप्प झाल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात पालिकेच्या तिजोरीत नगण्या मालमत्ता कर जमा झाला आहे.
सेवा शुल्क आणि मालमत्ता करावरून पनवेलमध्ये नाराजी आहे.लोकसभा निवडणूकीत मतदार आपला रोष मतपेटीतून दाखवून देतील म्हणूनच वसुलीला ब्रेक दिला.
महादेव वाघमारे,
याचिकाकर्ते
नव्या वर्षांतील देयके वाटपाचे काम सुरू आहे.मालमत्ता कर वसुलीचे काम नियमितपणे सुरू आहे.पालिकेतील अनेक कर्मचारी निवडणूकीच्या कामासाठी नेमणूक झाली असल्यामुळे कर्मचारी देखील कमी आहेत......
मारूती गायकवाड
उपायुक्त,मालमत्ता कर
Post a Comment