सहकारी संस्थां अभिहस्तांतरण प्रक्रिया.... सिडकोच्या अभय योजनेला मुदतवाढ
पनवेल-: मावेजामुळे अभिहस्तांतरण प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांची अभिहस्तांतरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सिडको महामंडळाने अभय योजना जाहीर केलेली आहे.या योजनेची मुदत ३० जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.कामोठ्यातील एकता सामाजिक संस्थेच्या अमोल शितोळे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांच्याकडे मुदतवढीची मागणी केली होती.
नवी मुंबई,पनवेल परिसरात सिडकोने भाडेपट्यावर दिलेल्या भूखंडाचा मावेजा शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या वादामुळे अनेक ठिकाणी अदा करण्यात आलेला नाही.त्यामुळे साडेबारा टक्के योजनेच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या अनेक इमारतींचे अभिहस्तांतरण रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कामोठ्यातील सामाजिक कार्यकर्ते अमोल शितोळे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाच्या माध्यमातून मावेजाचा गुंता सोडवण्याची विनंती केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने उचित कार्यवाही केली आहे.सहकारी संस्थांची अभियास्तांतरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सिडको महामंडळाने अभय योजना जाहीर केली असल्याचे अमोल शितोळे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवले आहे.
या योजनेची माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.ऑनलाइन पद्धतीने सिडको संकेतस्थळावर अर्ज दाखल करून कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून या योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापक शहर सेवा २ यांनी अमोल शितोळे यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे.
इमारत बांधकामाच्या सुरुवातीलाच सिडकोने बांधकाम व्यवसायिकाकडून मावेजा तसेच विकास शुल्काची रक्कम घेऊन त्यानंतर परवानगी देणे गरजेचे होते. सिडकोने या पद्धतीला बगल दिल्यामुळे सदनिका धारकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिकांनी सिडकोच्या अभय योजनेचा लाभ घेतला पाहिजे.यासाठी एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
- अमोल शितोळे,
एकता सामाजिक संस्था कामोठे
Post a Comment