News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पावसाळ्यात खारघरचा पांडवकडा भाग पर्यटकांसाठी बंद राहणार .... मान्सूनपूर्व तयारी व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत पनवेल महानगरपालिकेची नियोजन बैठक

पावसाळ्यात खारघरचा पांडवकडा भाग पर्यटकांसाठी बंद राहणार .... मान्सूनपूर्व तयारी व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत पनवेल महानगरपालिकेची नियोजन बैठक

पनवेल,दि.29 :  पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रांतील मान्सुन पूर्व तयारी व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबतचे नियोजन याविषयांवरती आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसेच आपत्ती काळातील व्यवस्थापन या विषयांवरती  चर्चा करण्यात आली. 

 यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिक्षक प्रवीण बोडखे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, सहाय्य्क आयुक्त स्वरूप खारगे, महापालिका विविध विभागाचे विभाग प्रमुख, पोलिस स्थानकांचे पोलिस निरीक्षक, विज वितरण, सिडको प्राधिकरण ,महाराष्ट्र राज्य् परिवहन महामंडळ अशा विविध विभागाचे प्रतिनिधी या बैठकिस उपस्थित होते.
यावेळी धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याकामी पोलिस विभागाने सहकार्य करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच पांडवकडा भाग पावसाळ्यात धोकादायक असतो. अनेकदा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. याचा विचार करता पावसाळ्याच्या कालावधीत पांडवकडा भाग नागरिकांसाठी बंद ठेवण्याच्या दृष्टीने  फलक लावण्याच्या सूचना बांधकाम विभागास देण्यात आल्या. तसेच त्याठिकाणी पोलिस विभागानेही महापालिकेला सहकार्य करावे अशी विनंती आयुक्तांनी केली.

जे एसटीपी प्लॅन्ट सिडकोने हस्तांतरीत केले नाहीत अशा एसटीपी प्लॅन्टमधील बंद पंपाची दुरूस्ती करून ते सुरू ठेवणे, पावसाळ्यात ठिकठिकाणचे जनरेटर नेहमी कार्यान्वीत  ठेवणे , सिडको हद्दीतील बंद विद्युत व्यवस्था सुरू करणे , सिडको हद्दीतील नाले,गटारींची साफसफाई करणेअशा विविध सूचना सिडको विभागास यावेळी देण्यात आल्या. 

महापालिका बस स्थानकाजवळील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा पावसाळ्यात अखंडित राहील याची दक्षता घेणे, अतिधोकादायक इमारतींमधील विद्युत पुरवठा खंडित करणे,  क्षेत्रातील धोकदायक विद्युत खांब व विद्युत वाहिन्या हटविणे, नाल्यामधून टाकण्यात आलेल्या केबल अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे, ओव्हर हेड लाईन वर असलेल्या झाडांची छाटणी करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागास सूचित करण्यात आले. पावसाळ्यात अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या संदर्भात दुर्घटना होण्याची शक्यता असते, त्यामुळे रात्रपाळीवर पुरेसे मनुष्य्बळ उपस्थित राहील याची दक्षता घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागास सूचना देण्यात  आल्या.

पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावर पुरेसा विद्युत पुरवठा तसेच पथदिवे कार्यान्वित ठेवणे, तसेच राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खड्डे विरहित राहतील याची दक्षता घेण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागास सूचित करण्यात आले.बस स्थानकासमोरील महामार्गालगत पाण्याचा निचरा करणाऱ्या पाईप्सची दुरूस्ती करणे, महामार्गावरील खड्डे भरून घेण्याबाबात भागात  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास सूचित करण्यात आले.

बस स्थानकामधील उभारण्यात आलेल्या होर्डिग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करून महापालिकेस सादर करणे, स्थानकातील खड्डे बुजवणे, बस स्थानकाशेजारील अनधिकृत होर्डिग्जवर संयुक्त कारवाईस सहकार्य करण्याबाबत एसटी महामंडळ विभागास सूचना देण्यात आल्या.पालिका हद्दीतील धोकादायक स्थितीत असणाऱ्या  झाडांची , फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागास देण्यात आल्या. रस्त्यांची कामे , पाईप लाईन, विद्युत वाहिन्यांची कामे करण्यासाठी वर्क ऑर्डर वाहतूक विभागाला देण्याबाबत महापालिकेच्या संबधित विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या. पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुर फवारणी व जंतुनाशके फवारणी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना  आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या.

महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या अतिधोकादायक शाळा निष्कासित करणे व दुरूस्तीयोग्य शाळांची दुरूस्ती करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.महापालिका हद्दीतील पावसाळ्यात पाणी तुंबण्याची ठिकाणे शोधून त्याठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी उपाययोजना करणे, कालुंद्रे येथील हायवे पासून कालुंद्रे येथे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साठते तर त्याठिकाणी पाईप टाकण्याच्या  सूचना आयुक्तांनी पालिकेच्या मलनिस्सारण विभागास दिल्या. 

सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्याच्या गाडीतील माईक,बॅटरी ,सायरन व इतर आपत्कालीन परिस्थितीत लागणारे साहित्य,यंत्रे,वाहने हे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याबाबत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
तसेच गाढी नदी,काळुंद्रे नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील नागरीकांना इतर ठिकाणी निवा-याची सोय करण्यासाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याबाबत बांधकाम विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या.

पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मान्सुनपूर्व कामकाजाचा आढावा महापालिकेच्यावतीने घेण्यात आला. तसेच महापालिका आणि शासनाच्या विविध विभागांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याने सर्वांनी आपआपली जबाबदारी लक्षात घेऊन काम करण्याबाबत आयुक्तांनी यावेळी सर्वांना सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment