विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन,१८वर्षीय तरुण जखमी ... दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल,दि.24 (वार्ताहर) ः विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून शर्यतीतील बैल अंगावर गेल्याने ठोकर लागून 18 वर्षीय जयेश जयराम जाधव हा तरुण जखमी झाला.या प्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37,1,3 प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून तसेच बैलगाडा शर्यत आयोजनाबाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे व बैलगाडा शर्यत आयोजित करताना प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 महाराष्ट्र राज्यात लागू असताना त्यांच्या तरतुदींची आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम 2017 चे उल्लंघन करून विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे नेरे येथे आयोजन करण्यात आले. त्यावेळी बैलगाडीवान याच्या हईघईने शर्यतीत बैल अंगावर गेल्याने ठोकर लागून ढोकेगाव, मांगरूळ,अंबरनाथ येथील जयेश जयराम जाधव याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Post a Comment