साहित्यातील दीपस्तंभ : आदरणीय मधुभाई ....... कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस .. त्यानिमित्ताने आबा पाटील यांनी लिहिलेला हा लेख
( आबा पाटील )
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात सन १९९० ला ६४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे अध्यक्ष, कोकणचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनेक झाले, प्रत्येकांनी आपापल्या परीने साहित्य क्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या अर्थाने साहित्य प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी ज्या तळमळीने कार्य केले ते अद्वितीय ठरते. कारण त्यांना मिळालेल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी खऱ्या अर्थाने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी कृतीयुक्त प्रयत्न केला. साहित्य क्षेत्रांत सुरू असलेल्या परंपरा सोबत घेत नवी दिशा साहित्य क्षेत्राला दिली. म्हणूनच ते साहित्य क्षेत्रातील एक दीपस्तंभ म्हणावे लागेल.मुळात त्यांची आणि माझी पहिली ओळख ही मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय साहित्य संमेलनात झाली. त्यावेळी त्या संमेलनाचा मी कार्याध्यक्ष होतो. तेंव्हापासून आदरणीय भाईंनी माझ्या पाठीवर सदैव नव्या ऊर्जेचा आणि आशीर्वादाचा हात कायम ठेवला. त्यावेळेपासून ते आजपर्यंत आदरणीय मधुभाईंची प्रत्येक भेट ही नविन विचार शिकवणारी असते. आज वयाची नव्वदी पार केल्यानंतरही त्यांचा उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतो. अत्यंत साधी राहणी, समाजोपयोगी असणारी मौलिक विचारसरणी, आकाशाला भिडणारी वैचारिकदृष्टी असतानाही कधीही मातीची जोडलेली नाळ तुटू न देता आदर्शवत जीवनशैली निर्माण करणारे मधुभाई मनाचा ठाव घेतात.अशा या नवविचारांनी युक्त असलेल्या आदरणीय मधुभाई यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करुळ ता. कणकवली,जि.सिंधुदुर्ग येथे झाला. लहानपणापासूनच गरीबीचे चटके सहन करत ते मोठे झाले.शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या.मात्र त्या दूर करत शिक्षण पूर्ण केले. ते शालेय शिक्षण घेत असताना,त्यांच्या शाळेत एकदा साने गुरुजी यांचे कथाकथन झाले. त्यानंतर साने गुरुजींनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना सर्व विद्यार्थ्यांना विचारले की, तुम्ही मोठेपणी काय - काय होणार? अनेकांनी अनेक उत्तरे दिली;मात्र आदरणीय मधुभाई यांनी मात्र मी मोठेपणी साहित्यिक होणार असे सांगितले. मराठीत म्हण आहे की, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! आदरणीय मधुभाई यांचे हे उत्तर याचीच प्रचिती देते.तेंव्हापासून समाजातील नकारात्मकतेला दूर सारत सकारात्मकता स्वीकारणाऱ्या लेखणीतून सुरू झालेला, त्यांचा नैराश्यावर मात करणारा हा प्रवास मोठा आशावाद निर्माण करत, आज त्यांच्याच कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी गगनाला नेउन भिडवला आहे.आदरणीय मधुभाईनी आपल्या जीवनातील पहिल्या नोकरीचा प्रवास सन १९५२ साली एस्. टी. खात्यामध्ये नोकरी करत सुरू केला. आणि गाव तिथे एसटी याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात त्यांचे साहित्य पोहचले.आदरणीय मधुभाई यांचा एसटी खात्यातुन सुरू झालेला प्रवास गोवा शासनाचे प्रकाशन अधिकारी, महाराष्ट्राचे सहाय्यक प्रसिद्धी संचालक, मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी, महाराष्ट्र लघुउद्योग विकास मंडळाचे महाव्यवस्थापक, कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, निवडणूक आयोगाचे प्रचारक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ही व यासारखी विविध पदे भूषवून त्या - त्या पदाला, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर योग्य न्याय देत, वयाच्या पन्नाशीतच नोकरीचा राजीनामा देऊन लेखन व साहित्यिक कार्य यासाठी स्वतःला समर्पित केले.तसे पाहता त्यांच्या लेखांची जादू ही त्यांच्या माध्यमिक शिक्षणापासूनच दिसायला लागली. कारण त्यांची पहिली कथा ते मॅट्रिकला असतानाच प्रसिद्ध झाली. मग मात्र त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. आपल्या जनमाणसात रुळणाऱ्या आणि जनजीवनाचे वास्तव दर्शन घडवणाऱ्या लेखणीच्या माध्यमातून कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित गद्य, बालवाङ्मय यासह सर्वच प्रकारात त्यांनी लेखन केले. त्यासोबतच महाराष्ट्र, गोवा, बेळगाव यासारख्या ठिकाणाहून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांतून त्यांनी विविध विषयांवर स्तंभलेखन करताना अनेक विषयांवर प्रकाश पाडला. त्यामुळे त्यांच्या लेखणीची प्रचिती सर्वांच्याच नजरेस पडली. थोडक्यात अशा वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांनी लेखन करत त्यांनी आपल्या प्रतिभेचा प्रत्यय वाचकांना वेळोवेळी दिला आहे.
आदरणीय मधुभाई यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी साहित्य क्षेत्रात विपुल लेखनच केले नाही, तर त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मिळालेल्या सहवासाचा फायदा साहित्य चळवळीला करून दिला. ते ज्यावेळी १९९० साली रत्नागिरी येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.त्यानंतरच्या काळात त्यांनी आपल्या या अध्यक्षपदाच्या माध्यमातून मिळालेल्या अनुभवाचा फायदा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेसाठी केला. महाराष्ट्राच्या किंवा भारतातील प्रत्येक राज्याच्या विविध विभागात त्या - त्या विभागाच्या नावाने साहित्य संस्था उभ्या आहेत मग कोकणात का नको? या एका प्रश्नांच्या उत्तराचा ध्यास मनात घेत त्यांनी अख्ख कोकण आपल्या सहकाऱ्यांसह पिंजुन काढत, सर्वांच्या मनात नवी दिशा दाखवत कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर त्यांनी कोकणातील साहित्य चळवळीला नवी दिशा देताना अनेकांना लिहिते केले. त्यांना लिहिण्याची, व्यक्त होण्याची प्रेरणा दिली. परिणामी आज पालघर ते सिंधुदुर्ग व्हाया मुंबई मार्गे कोकण मराठी साहित्य परिषद कोकणात सर्वदूर पोहोचली. आज अनेक शाखा, असंख्य सभासद, विविध समित्या आणि साहित्यिक या माध्यमातून तयार झाले. ज्या स्वच्छ आणि प्रामाणिक हेतूने कोकण मराठी साहित्य परिषदेचे रोपटे आदरणीय मधुभाई यांनी लावले, आता त्याचा मोठा आणि आधार देणारा वटवृक्ष झाला. त्याच वटवृक्षाच्या फांद्या पकडून अनेकजण साहित्य चळवळीच्या क्षेत्रात झोके घेत राहिले.आदरणीय मधुभाई हे एक स्वतः नवनिर्मिती करणारे साहित्यिक होते. ते नेहमी म्हणत की, साहित्यिकांकडे दोन दृष्टी असतात. एक म्हणजे ज्यातून तो बहिरंग पाहतो आणि त्यातून तो समाजाचे अंतरंग पाहतो. आणि मला वाटते की आदरणीय मधुभाई यांच्याकडे दुसरी दृष्टी ही अत्यंत शोधक होती. म्हणूनच ते दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीने एवढे मोठे कार्य उभारू शकले. हीच जिद्द आदरणीय मधुभाई यांनी सतत बाळगत सर्वानाच आपल्या नि:स्वार्थी आणि प्रामाणिक कार्याच्या जोरावर या जिद्दीचा परिचय करून दिला त्यामुळे असंख्य अडचणी, मानवनिर्मित समस्या, विविध शंका यावर मात करत आज कोकण मराठी साहित्य परिषद खंबीरपणे आदरणीय मधुभाईच्या नेतृत्वात उभी आहे.
आदरणीय मधुभाई यांचे कार्य सांगायचे म्हणजे प्रचंड मोठा ग्रंथ होईल; पण एक उल्लेख मुद्दामहून करावाच लागेल. तो म्हणजे आदरणीय मधुभाई यांनी मराठी साहित्यातील आद्यकवी कवी केशवसुतांच्या जन्मगावी कवी केशवसुतांचे उभारलेले देखणे आणि भव्य स्मारक. याकामी मालगुंड ग्रामस्थ, मालगुंड एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन या सर्वांच्या मदतीने त्या - त्या विभागात आपल्या कौशल्याचा वापर करत त्यांनी हे स्मारक नावलौकिकास आणले आहे. याकामी मालगुंड एज्युकेशन सोसायटीने स्मारकासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिल्यानंतर आदरणीय मधुभाई यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने कवी केशवसुत नुसतेच आणले आहे असे नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांच्या नावे असलेल्या स्मारकांपैकी एक आदर्शवत आणि अग्रक्रमाने भेट द्यावी असे व्यवस्थापन आदरणीय मधुभाईंनी स्मारकाचे उभारले आहे. आज परदेशात अनेक साहित्यिकांची उत्कृष्ट स्मारके आहेत. काही गावे तर अशी आहेत की, त्या गावांना अशा साहित्यिकांच्या स्मारकामुळे नवी ओळख जगाच्या पाठीवर मिळाली. याच बाबींचा अभ्यास मधु मंगेश कर्णिक यांनी केला. आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कवी केशवसुत यांचे स्मारक व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आदरणीय मधुभाई यांनी मालगुंड येथे हे स्मारक उभारले. आज या स्मारकात आधुनिक कवींचे काव्यदालन, सुसज्ज सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय, अद्ययावत खुले सभागृह, तुतारी काव्यशिल्पे यासारख्या अद्ययावत गोष्टी उभारल्या. परिणामी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक क्षेत्रातील असंख्य पर्यटक या स्मारकाला भेट देऊन कौतुक करत असतात. आज अनेक साहित्यिक उपक्रम येथे राबविण्यात येत आहेत. त्यामाध्यमातून साहित्यिक चळवळी वृद्धिंगत व्हायला मदत झाली आहे. या स्मारकाच्या नूतनीकरण व इतर कामासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, अनेक नामवंत संस्था, मान्यवर व्यक्ती यांच्याकडून आपल्या संवाद कौशल्याच्या द्वारे निधी उपलब्ध करून घेतला. म्हणूनच त्याचे कर्तृत्व इतरांपेक्षा नक्कीच उल्लेखनीय ठरते.मालगुंडमधील अण्णा राजवाडकर यांच्या प्रशासकीय अनुभवसंपन्न कार्यावर विश्वास ठेवून आदरणीय मधुभाईंनी त्यांच्यावर कवी केशवसुत स्मारकाची जबाबदारी सोपविली. महत्वाचे म्हणजे स्व. अण्णांनी देखील निर्मळ व निःस्वार्थी भावनेने स्मारकाची वाटचाल सुरू ठेवली.तब्बल २८ वर्षे अत्यंत पारदर्शकपणे ही धुरा सांभाळल्यानंतर स्व. अण्णांनी आपल्या वाढत्या वयाचा विचार करून, त्यांनी लेखी पत्राद्वारे आदरणीय मधुभाई यांच्याकडे कार्याध्यक्ष पदासाठी माझ्या नावाची शिफारस केली. विशेष म्हणजे कोमसापचे विश्वस्त स्व. माजी न्यायमूर्ती भास्करराव शेट्ये, विश्वस्त अरुण नेरुरकर, विश्वस्त प्रमुख रमेश कीर, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांनीही स्व. अण्णांच्या निधनानंतर आदरणीय मधुभाई यांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दर्शविण्यासाठी संमती दिली. आदरणीय मधुभाईच्या मार्गदर्शनाखाली आज कवी केशवसुत स्मारक हे अत्याधुनिक बनत असल्याचा अभिमान वाटतो.त्यांच्या याच दैदिप्यमान कार्याची दखल घेत त्यांना शासनाचे आणि विविध साहित्यिक क्षेत्रातील संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात उल्लेखनीय म्हणजे त्यांचे कार्य पाहून त्यांना भारत सरकारने भारताचे राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री हा पुरस्कार प्रदान केला.यासह गदिमा पुरस्कार, कर्मयोगी पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार,विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार, जनस्थान पुरस्कार या व अशा अनेक प्रसिद्ध आणि नामवंत पुरस्कारांनी आदरणीय मधुभाई यांना गौरवण्यात आलं आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास करुळच्या या अद्भुत सुपुत्राने आपल्याला लाभलेल्या सृजनशील दृष्टीने शाळेबाहेरील अनेक सवंगड्याच्या सहकार्याने कोकण मराठी साहित्य परिषदेसारखी अत्यंत उपयुक्त अशी सृष्टी उभारत कष्टाच्या भाकरीच्या जोरावर साहित्यरुपी फुलांचा सुगंध पसरवत, जैतापूच्या बत्तीतून तारकर्ली बेटावर नेत, कोकणातील कातळाचे विहंगम दर्शन घडवून आणत अंधार आणि अज्ञान यामुळे आलेल्या नैराश्यावर, उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने आपल्या सहवासात असलेल्या सर्वांवरच दिलखुलास हास्याचे पांघरूण घालत आपल्या साहित्याचा सुरू केलं प्रवास माहीमच्या खाडीतून सर्व साहित्यविश्वात पसरवला. परिणामी आदरणीय मधुभाई म्हणजे साहित्य निर्मितीचे उगमस्थान आहे हे त्यांच्या आजच्या वयाच्या नव्वदीत पोहचल्यानंतरही त्यांच्या कार्याच्या तत्परतेकडे पाहिल्यानंतर समजते.
आदरणीय मधुभाई यांचा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा संघर्ष हा येणाऱ्या पिढीसाठी नवा आदर्श निर्माण करत आहे.त्यांना त्यांच्या याच संघर्षमय आयुष्याबद्दल विचारले असता ते नेहमी म्हणत असतात की, माझ्या भावी आयुष्याचं प्रशिक्षण माझ्या बालपणीच्या काटेरी दिवसांनी केलं.एवढ्या सहजपणे ते आयुष्याकडे पाहतात. त्यांचा हाच सहजपणा सर्वानाच नवी ऊर्जा मिळवून देतो.ज्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उभारणीत आदरणीय मधुभाई यांनी आयुष्य खर्ची घातले, त्याच कोकण मराठी साहित्य परिषदेत असो वा त्यांच्या इतर कार्यात असो अनेकवेळा अनेक आरोप केले गेले, काही मुद्दामहून तर काही पूर्वग्रहदूषितपणे,त्यासोबतच अनेक पेल्यातील वादळे आली; पण आदरणीय मधुभाईच्या निःस्वार्थी आणि प्रामाणिक कार्याच्या पर्वतापुढे ती वादळे मात्र पेल्यातच नाहीशी झाली.मात्र आदरणीय मधुभाईनी कधीही या अशा अवरोधक बाबींचा परिणाम हा कोकण मराठी साहित्य परिषदेवर वा इतर संस्थात्मक किंवा सामाजिक कार्यात होऊ दिला नाही.
आज अनेक साहित्यिक हे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहवासात मोठे झाले, होत आहेत, होत राहतील. जेव्हा - जेव्हा साहित्यवृद्धीच्या चळवळीचा इतिहास लिहिला जाईल, तेंव्हा - तेंव्हा त्यातील अनेक पानावर आदरणीय मधुभाई यांचे नाव,त्यांच्या कर्तृत्वामुळे नक्कीच असेल असा ठाम विश्वास सर्वानाच आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे आदरणीय मधुभाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने सुरु झालेला मराठीच्या भल्यासाठी ... मराठीचे व्यासपीठ हा उपक्रम.
यामध्ये १.महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची व्हावी, २. मराठी भाषा भवन उभारावे
आणि ३. मराठी भाषा प्राधिकरण व्हावे.या मागण्यासह त्यांनी लक्षणीय आणि यशस्वी चळवळ सुरू केली आहे. या उपक्रमात आदरणीय मधुभाई यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन महाराष्ट्रातील तब्बल २८ संस्था एकत्र आल्या आहेत. ही बाब समस्त कोकणवासियासाठी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेसाठी अभिमानाची आहे. महत्वाचे म्हणजे आदरणीय मधुभाईंनी या माध्यमातून शासनाकडे मराठी भाषा सक्तीची व्हावी, मराठी भाषा प्राधिकरण व्हावे आणि मराठी भाषा भवन उभारावे या मागण्या केल्या होत्या. त्यातील मराठी भाषा सक्तीची ही मागणी मान्य झाली आहे आणि इतर दोन मागण्या लवकरच मान्य होतील अशी अपेक्षा आहे. साहित्यात सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करत एक नवी सुरुवात केल्यानंतर आपल्या सर्व सहकारी यांच्या माध्यमातून सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले त्यामुळे आदरणीय मधुभाई हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत असेच म्हणावे लागेल. आदरणीय मधुभाई यांच्या दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास
मी असा सर्वत्र होता,
मी मला विसरून गेलो,
हृदय हृदयी जोडताना,
त्यामध्ये विखरून गेलो....
अशा प्रकारे अत्यंत निःस्वार्थी भावनेने प्रेरीत होऊन कार्य करत दीपस्तंभ बनलेले आहेत.आज आदरणीय मधुभाई यांचा वाढदिवस.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आदरणीय भाईंनी शतायुषी व्हावे हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना! नव्वदी पार केल्यानंतरही अत्यंत उत्साहाने कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य क्षेत्रात आदरणीय मधुभाई वावरत असतात.भविष्यात आदरणीय मधुभाईना उत्तम आरोग्य आणि समाधान लाभावे हीच प्रार्थना..
श्री.गजानन कमलाकर तथा आबा पाटील,
अध्यक्ष - कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती, मालगुंड
Post a Comment