महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीत उद्योजकांचा महत्त्वाचा वाटा -- पालकमंत्री उदय सामंत ....पनवेल औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा विकास योजनेच्या कामांचे भूमिपूजन
पनवेल - महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीत उद्योजकांचा महत्त्वाचा वाटा असून प्रदूषण करणारे तसेच जनतेला,शेतकऱ्यांना त्रास देणारा असा कुठलाही प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार नाही,असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
पनवेल महानगरातील जुन्या असलेल्या पनवेल औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत पायाभूत सुविधा विकास योजनेच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खा.श्रीरंग बारणे,आ.प्रशांत ठाकूर,जिल्हाधिकारी किशन जावळे,उद्योग सहसंचालक विजु सिरसाट,जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.हरळय्या,पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे,उपाध्यक्षा सुवर्णा पुराणिक यांसह पनवेल औद्योगिक वसाहतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री सामंत म्हणाले,राज्यात गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून यावर्षी 1 लाख कोटींची स्थानिक गुंतवणूक झाली आहे.राज्य शासनाने उद्योजकांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे.त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे तसेच केंद्र शासनाने अलीकडे केलेल्या कायद्याचा उद्योजकांना निश्चित फायदा होईल.माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
पनवेलची ही सर्वाधिक जुनी औद्योगिक वसाहत आहे. येथील सोयी सुविधासाठी,विकास कामांसाठी 15 कोटी मंजूर केले आहेत.या वसाहतीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ.प्रशांत ठाकूर यांनी,पायाभूत विकास कामांसाठी निधी दिल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आजवर जे घडले नव्हते ते आज विकासाच्या माध्यमातून घडणार आहे.उद्योगांमधून रोजगार निर्माण झाल्याने रायगडमध्येही विकासाचे मोठे बदल होतील असे सांगितले.
पनवेल वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात,पनवेल औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा आहे. शासनाच्या पायाभूत सुविधांमुळे खऱ्या अर्थाने औद्योगिक वसाहतीतील विकासाचे स्वप्न पूर्ण होत आहे.वसाहतीला पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो.आज ती विकासाची कामे पूर्ण होणार आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी पनवेल औद्योगिक वसाहतीतील महिला उद्योजिका सुवर्णा पुराणिक,जयश्री व्यास,ममता त्यागी त्याचप्रमाणे तिसऱ्या पिढीतील उद्योजक दीप लोखंडे,गौरव जोशी,अभिषेक धोंड,सचिन कोठारी,झाल सेठना,हर्षल सूचक,जिनल सूचक,सिद्धार्थ सूचक,राज कामेरकर,सौरभ कांडपिळे,कृतार्थ पटेल,मंदार पोतदार,दीपक परमार,रोशनसिंह सगु,रोहन गिलरॉय,श्रिजय सुरतकल यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे आभार पनवेल औद्योगिक वसाहतीच्या उपाध्यक्षा सुवर्णा पुराणिक यांनी मानले.
Post a Comment