करा साजरी होळी.... दान करा पुरणपोळी! संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्थेचे आवाहन!
पनवेल दि २३,(वार्ताहर) : आपल्याकडे होळीला पुरणाच्या पोळ्या करण्याची परंपरा आहे. घरात गोड धोड केलं जातं. 'होळीत दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा'...अशी त्यामागची कल्पना असते.याच भावनेनं होळीत पुरणपोळी अर्पण केली जाते.हे अन्न जळून खाक होण्याऐवजी ते गरीब आणि अर्धपोटी झोपणाऱ्यांच्या मुखात जावे या उद्देशाने संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्था गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. यंदाही होळीनिमित्त पुरणपोळी दान करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी सांगितले.
दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या होळीच्या सणामागील उद्देश आहे, होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. पनवेल परिसरामध्ये हा हिलकोत्सव ठीक ठिकाणी साजरा केला जातो. हा परिसर कोकणात येत असल्याने याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. गावागावांमध्ये होळी पेटवली जाते, त्याला पनवेल परिसरातील शहर सुद्धा अपवाद नाहीत. हा पारंपारिक सण अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो. जंगलामधून वाळलेले फाटे आणले जातात. त्याचबरोबर आता भाताचा पेंडा सुद्धा ग्रामीण भागांमधून विकत आणला जातो. पारंपारिक पद्धतीने होळीला पुरणपोळ्या चा नैवेद्य दाखवला जातो. या पोळ्या होळीमध्ये टाकल्यामुळे त्या जळून खाक होतात. या हिंदू सणानिमित्त गरिबांचे तोंड सुद्धा गोड व्हावे या उद्देशाने होळीत पोळी न टाकता त्या जमा करण्यात येतात. यासाठी संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेने ही गेल्या काही वर्षांपासून पुढाकार घेतला आहे. यंदाही होळीनिमित्त पुरणपोळी दान हा संकल्प या संस्थेने केला आहे. त्यानुसार संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी पनवेल सह करंजाडे व इतर परिसरातील नागरिकांना 24 मार्च रोजी पुरणपोळी दान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
कुंडेवहाळची पुरणपोळी दान परंपरा! ...
पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावातील देवदूत ग्रुपच्या माध्यमातून संकल्प संस्थेच्या सहकार्याने होळीच्या सणानिमित्त पुरणपोळी त्याचबरोबर इतर पदार्थ प्रत्येक घरातून दान करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. या पोळ्या गोरगरीब आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना वाटप केल्या जातात. त्यांनाही गोडधोड देऊन सामाजिक बांधिलकी जपली जाते.
Post a Comment