नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक -मंत्री उदय सामंत ... कोकणभवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक
पनवेल (प्रतिनिधी) सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (सोमवार, दि. १२) कोकणभवन येथे दिले.
सिडकोअंतर्गत नैना परिक्षेत्रात शासनाकडून मंजूर युडीसीपीआरच्या तरतुदी तातडीने लागू करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्या संदर्भात सीबीडी बेलापूर येथे कोकणभवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्या वेळी मंत्री सामंत बोलत होते. या बैठकीस आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जयंत पाटील, महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे.एम. म्हात्रे, शिवसेना (ठाकरे गट ) जिल्हा सल्लागार बबन पाटील, शिवसेना(शिंदे गट) जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, युवा नेते राजेश पाटील, पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भाजपचे नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे. या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण व पेण तालुक्यातील १७५ गावांचा समावेश आहे. नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये २३ गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित १५२ गावांची प्रारूप विकास योजना १६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे. नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, येणार्या कालावधीमध्ये नैना क्षेत्रातील प्रत्येक टीपीएस योजनेमधील गावांच्या समस्या सोडविण्यासाठी सिडको (नैना) मार्फत प्रत्येक गावनिहाय समस्या निवारण शिबिराचे आयोजन केले जावे. यामुळे नैना प्रकल्पातील सर्व गावातील शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणी मांडण्यास संधी मिळेल व त्यांच्या समस्या सुटण्यास प्राधान्य मिळेल अशी मागणी मी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी याच पद्धतीची कार्यवाही करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत, अशीही माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान,जासई येथील महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानच्या निवेदनाच्या अनुषंगानेही पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक विचार करेल,असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
Post a Comment