सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सर्वेक्षण ...सर्वेक्षणासाठी सुमारे ६०० कर्मचारी व ४० पर्यवेक्षक
पनवेल -: राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने दिनांक 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर महापालिकेच्या मनुष्यबळाकडून कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.कामकाजाकरीता सोसायट्यांमध्ये येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांचे सहकार्य लाभत असले तरी देखील आपल्या सोसायटीतील सर्व सदस्यांना याबाबतची पूर्वसूचना द्यावी व सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना केले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे ६०० कर्मचारी व ४० पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी शासनाच्यावतीने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल चारही प्रभागासांठी प्रभाग अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान आज उपायुक्त गणेश शेटे यांनी सर्वेक्षण स्थळी भेटी देली . तसेच नोडल अधिकारी, पर्यवेक्षक व प्रगणक यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
गेल्या दोन चार दिवसांपासून सुरू असलेल्या या सर्वेक्षणांतर्गत सुमारे ५७ हजार कुटूंबाचे नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिकेच्यावतीने शनिवार व रविवारची सुट्टी न घेता सकाळी आठ वाजल्यापासून या सर्वेक्षणास सुरूवात करत असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे सर्वेक्षण केले जात आहे. अजूनही ज्या प्रभागातील सोसायट्यांमध्ये सर्वेक्षण झाले नाही अशा सोसायटीच्या अध्यक्षांनी संबंधित प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
महापालिकेचे हे कर्मचारी प्रगणक म्हणून गृहभेटी देत असून शासनाने दिलेल्या विहित नमुन्यातील माहिती संकलित करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना अचूक व बिनचूक माहिती द्यावी तसेच या कालावधीत उपलब्ध रहावे. हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.
Post a Comment