News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल रेल्वे स्थानक परीरातून मुलाच्या अपहरणप्रकरणी महिलेला कारावास

पनवेल रेल्वे स्थानक परीरातून मुलाच्या अपहरणप्रकरणी महिलेला कारावास

पनवेल  : पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या एका महिलेला कल्याण रेल्वे न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठवला.दंड न भरल्यास महिलेला एक महिन्याचा साधा कारावासा भोगावा लागणार आहे.दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाचा निकाल एक वर्ष चार महिन्यांतच लागला.

मूळचे अमरावतीचे असलेले सहा जणांचे एक कुटुंब मागील तीन वर्षांपासून पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर पदपथावरच राहात होते.१६ जून २०२२ रोजी हे कुटुंब येथील पदथावर झोपले होते. पहाटे ५.४५ वाजता दाम्पत्य जागे झाल्यानंतर ते प्रातः विधीसाठी गेले.पुन्हा त्याठिकाणी आल्यानंतर त्यांचा दोन वर्षांचा मुलगा गायब असल्याचे दाम्पत्याच्या निदर्शनास आले. दाम्पत्याने पनवेल रेल्वे स्थानक परिसर तसेच, आसपासच्या वस्त्यांमध्ये मुलाचा शोध घेतला. मात्र, मुलगा न मिळाल्याने त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पनवेल पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मुलाचा शोध घेत असताना रेल्वे पोलिसांना एका महिलेकडे अपहृत मुलगा सापडला. ही महिला पनवेल तालुक्यात राहात असून पोलिसांनी तिला अटक केली. भीक मागण्याच्या उद्देशाने तिने अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.आरोपी महिलेने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिला जामीन न मिळाल्याने अद्यापही ती कारागृहात आहे. या प्रकरणाची सुनावणी कल्याण रेल्वे न्यायालयात चालू होती. सहाय्यक सरकारी वकील जयश्री कोरडे यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले.आरोपी महिलेने (३५) भीक मागण्याच्या उद्देशाने मुलाचे अपहरण केल्याचे सिद्ध झाले नसले तरी उपलब्ध पुराव्यावरून तिने पालकांच्या ताब्यातून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचे सिद्ध झाले. अॅड. कोरडे यांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला कडक शिक्षा देण्याबाबत न्यायालयात युक्तिवाद केला.चिमुकल्याला त्याच्या आई- वडिलांपासून हिसकावून घेणे गंभीर कृत्य असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश स्वयंम एस. चोपडा यांनी आरोपी महिलेला दोन वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.दंडाची रक्कम आरोपीने भरल्यानंतर ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार यांना देण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment