महात्मा फुले महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन : जगामध्ये मराठी भाषेचा गोडवा - ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख
पनवेल- महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल (मराठी विभाग) व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या समारंभात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांच्या हस्ते झाले.
महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली फुले महाविद्यालयात झालेल्या या समारंभप्रसंगी ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजाराम पाटील,मराठी विभाग प्रमुख डॉ.सोनू लांडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांनी, इंग्रजी शिवाय जगू शकत नाही ही भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये झाली आहे,त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.जगामध्ये मराठी भाषेचा गोडवा आहे.विद्यार्थ्यांनी लिहितं व्हा,निरंतर वाचन करा.वाचन संस्कृती जपा.शब्द हा मंत्र आहे.अक्षर,शब्दांवर प्रेम करा.शब्दातून आलेल्या सुगंधातून नव्या साहित्याची निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी,शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये जपली पाहिजेत. आई-वडिलांचे संस्कार हे शिक्षण घेत असताना जपले पाहिजेत.मराठी भाषा समृद्ध करण्याबरोबरच तिचे संवर्धन केले पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण गायकर यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात,मराठी भाषा श्रेष्ठ आहे.मराठी भाषेचा स्वाभिमान आणि अभिमान असला पाहिजे.मराठी भाषेला गोडवा आहे,तिचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे सांगितले कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग प्रमुख डॉ.सोनू लांडे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रफुल्ल वशेणीकर,प्रा.शरयू नाईक यांनी केले
Post a Comment