पनवेलकरांसाठी पुढील ८ ते १० दिवस ४० टक्के पाणी कपात
पनवेल : पनवेल शहरासह सिडको वसाहतींना पाणी पुरवठा करणा-या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) वायाळ येथील पाणी शुद्धीकरण केंद्रातील मोटार पंप नादुरुस्त झाल्याने पुढील ८ ते १० दिवस दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे.त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून पाणी पुरवठा केला जाणार आहे.
मात्र या दरम्यान पुढील काही दिवस पनवेलकरांना ३० ते ४० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. एमजेपी पनवेल महापालिकेला आणि सिडको वसाहतींना न्हावा-शेवा उपप्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील टप्पा-१ यामधून पाणी पुरवठा करते. मंगळवारी मध्यरात्रीपासून वायाळ येथील केंद्रातील पाण्याचा पंप नादुरुस्त झाल्याने काम हाती घेतल्याची माहिती एमजेपीचे उपविभागीय अभियंता के. बी. पाटील यांनी सांगितले.
एमजेपीने याबाबत करंजाडे, डेरीवली,वडघर,विचुंबे, उसर्ली,बेलवली-वारदोली,नांदगाव, कुडावे या गावांसह, सिडको महामंडळ, पनवेल महापालिका,बेलापूर रेल्वे प्रशासन,वीज महावितरण कंपनी यांनाही नोटीसीव्दारे कळविले आहे.एमजेपीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये या अपु-या पाणी पुरवठ्यामुळे पनवेल महानगरपालिका आणि सिडको मंडळाच्या व्यवस्थापनाने पाणी कपाती दरम्यान पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे सूचविले आहे.
Post a Comment