दुबईमध्ये नोकरीचे अमिष दाखवून १० पेक्षा जास्त तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक : कामोठे पोलीस स्टेशनमध्ये त्रिकुटाविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल
पनवेल : दुबईमध्ये नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून एका टोळीने १० पेक्षा जास्त गरजू तरुणांकडून २ ते ३ लाख रुपयांची रक्कम उकळून आपले कार्यालय बंद करून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीपक कुमार, अमित शर्मा व अजित कुमार अशी या टोळीतील त्रिकुटांची नावे असून कामोठे पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी त्रिकुटाने काही महिन्यांपूर्वी कामोठे सेक्टर-३४ मध्ये गल्फ शिपिंग या नावाने कार्यालय थाटले होते. तसेच दुबईसह इतर देशांमध्ये विविध पदावर नोकरी मिळवून देण्यात येत असल्याची जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीला भुलून अनेक गरजवंत बेरोजगार तरुणांनी या कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी आरोपी त्रिकुटाने दुबई येथील मार्शल शिपिंग कंपनीत मुजाषा सर्व्हर येथे ट्रेनी ओ.एस. तसेच चालक म्हणून नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवले होते. तसेच त्यासाठी या बेरोजगार तरुणांकडून २ ते ३ लाख रुपयांची मागणी केली जात होती. अशाच पद्धतीने या त्रिकुटाने अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले होते. काही तरुणांना तर या त्रिकुटाने दुबई येथील विमानाची बनावट तिकिटेसुद्धा दिली. काही तरुणांनी विमानाच्या तिकिटांची तपासणी केल्यानंतर हे तिकीट खोटे असल्याचे आढळले. त्यानंतर या तरुणांनी कामोठे येथील कार्यालयात धाव घेतली, मात्र त्यापूर्वीच आरोपी त्रिकुटाने आपले कार्यालय बंद करून पलायन केले. त्यानंतर या बेरोजगार तरुणांनी आरोपी त्रिकुटाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Post a Comment