काळ्या फिती लावून केला पनवेल महापालिकेच्या कारभाराचा निषेध! ... शेतकरी कामगार पक्षातर्फे घंटा गाड्यांचे दसऱ्यानिमित्त पूजन
पनवेल- शेतकरी कामगार पक्षाने घंटा गाड्यांचे दसऱ्यानिमित्त पूजन करून काळ्या फिती लावत पनवेल पालिकेच्या कारभाराचा निषेध केला.
पनवेल पालिकेने घाईघाईत गाड्यांचे टेंडर पास करून नवीन ५० पेक्षा जास्त घंटा गाड्या खरेदी केल्या मात्र गेली ४-५ महिने त्या तशाच कामोठेमधील मल:निसारण केंद्रात धूळखात पडून आहेत तर पालिकेचे प्रशासन गाड्या कमी आणि ना दुरुस्त असल्याचे सांगून कचरा उचलण्यास टाळाटाळ करत आहेत.काही ठिकाणी गळक्या गाडया वापरत असल्याने कचऱ्याच्या पाण्याचा दुर्गंध दिवसभर राहत आहे.ऐन सणासुदीला परिसरात फिरताना नाकावर रुमाल घेऊन फिरावे लागत आहे. पालिकेने एकूण ५३ गाड्या खरेदी करून रोड टॅक्स भरून वाहने पासिंग करून सुद्धा नागरिकांच्या सेवेत उतरवण्यात आली नाहीत.पालिकेच्या प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या नजरेत येऊ नये यासाठी कामोठे जास्त वर्दळ नसलेल्या सेक्टर ३२ येथील मल:निसारण केंद्रात ठेवल्या आहेत.आजूबाजूला गवत वाढल्याने हि वाहने भंगारात टाकली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.अडगळीत असल्याने उंदीर - घुशी यांना हक्काचा निवारा मिळाला आहे.त्याचबरोबर एक पावसाळा गाड्यांनी अंगावर घेऊन त्यांना आता गंज चढला आहे.
दसऱ्या निमित्त शेतकरी कामगार पक्षाने घंटागाड्यांना हार घालून पूजन केले तसेच पालिकेचा गचाळ कारभाराचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्या. यावेळी शेकाप कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे, उपाध्यक्ष नितीन पगारे, कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, संघटक अल्पेश माने, व्या. संघटना अध्यक्ष सुरेश घरात आदी उपस्थित होते.
या गाड्या लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणाव्यात तसेच पालिकेचे प्रशासन यांना जर गाड्या ७-८ महिन्यांनी वापरात आणायच्या होत्या तर निव्वळ दलाली लवकर मिळावी यासाठी या गाड्या लवकर खरेदी केल्या का? असा आरोप कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केला.
Post a Comment