पनवेल- नवीन पनवेेलला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील गर्दीच्यावेळी टाइल्स काढण्याचे काम : चेंगराचेंगरी झाल्यास अप्रिय घटना शक्यता?
पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकातील पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडणाऱ्या पादचारी मार्गावरील टाइल्स काढून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम गर्दीच्यावेळी देखील सुरू असल्यामुळे धावपळीच्या वेळेस चेंगराचेंगरीची घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण होते.पनवेल रेल्वे स्थानकामध्ये पूर्व आणि पश्चिम बाजूला जाण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल आहे. सुनियोजित पद्धतीने हे काम न केल्यास पनवेल स्थानक परिसरामध्ये अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणी पादचारी पुलावरील टाइल्स काढून त्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. पादचाऱ्यांना वाहून नेण्याची क्षमता ध्यानात घेता डांबरीकरण हा अत्यंत सक्षम पर्याय मानला जातो. परंतु पनवेल रेल्वे स्थानकातील उपनगरीय रेल्वे गाड्या आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या यांच्यामुळे येणारा फूट फॉल ध्यानात घेता हा पादचारी पूल मुळात तुटपुंजा ठरतो तसेच गर्दीच्या वेळी असली कामे होत असल्यामुळे नागरिकांना जाच सहन करावा लागतो. वास्तविक पनवेल रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम बाजूला जाण्यासाठी आणखीन एका अतिरिक्त पादचारी पुलाची आवश्यकता आहे. आत्ता आहे त्याच लांबी रुंदीचा पूल मंजूर झाल्याचे देखील समजते. असे असले तरी तूर्तास एकुलत्या एक पादाचारी पुलावरती ताण येत असल्यामुळे येथे गर्दीचे नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. या व्यतिरिक्त पूर्व व पश्चिम बाजूला पादचार्यांची वाहतूक करण्यासाठी आत्ता असलेल्या अर्धवट स्थितीतील अंडरपास पूर्ण करणे ही देखील काळाची गरज बनली आहे. अंडर पास चे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास पादाचारी पुलावरील ताण कमी होण्यास मदत होईल.अनेक बैठका निवेदने तसेच स्थानिक सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये देखील हा मुद्दा अग्रस्थानी मांडण्यात येत असतो.परंतु या कामातील तांत्रिक मेख पुढे करत रेल्वे प्रशासन अंडरपासचे काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. थोडक्यात अंडर पासचे काम करायचे नाही,पादचारी पुलाचे घोंगडे भिजत ठेवायचे!अशी निष्क्रिय भूमिका घेतल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसू शकतो आणि भविष्यात चेंगराचेंगरीसारख्या अप्रिय घटनांना सामोरे जावे लागू शकते.
Post a Comment