इर्शाळवाडी दुर्घटनेतील पितृछत्र हरवलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था करणार
पनवेल - (राज भंडारी) खालापूर तालुक्यातील चौक जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून होत्याचे नव्हते झाले. अंधाऱ्या रात्री अनेक घरे दरडीखाली गेल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या महाभयंकर प्रलयातून काहीजण बचावले,मात्र त्यांना राहायला ना घर होते,ना खाण्यासाठी काही जवळ होते.दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेत दरडग्रस्त बांधवांची राहण्याची तसेच अन्नसेवेची व्यवस्था श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्यावतीने करण्यात आली.
रविवारी या बांधवांचे प्रशासनाच्यावतीने तात्पुरते पुनर्वसन करण्यात आल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे भावूक झाले.यावेळी त्यांनी आई वडील गमावलेल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलून बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
इर्शाळवाडी दरडग्रस्त नागरिकांना जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात ठेवण्यात आले होते.मागील ४ दिवस या बांधवांची सेवा करताना कोणतीही असुविधा होऊ नये यावर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवले होते.मात्र रविवारी या दरडग्रस्त बांधवांचे प्रशासनाच्यावतीने तात्पुरते पुनर्वसन कॅम्प येथे करण्यात आले.आपल्या घरातील व्यक्ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा नक्कीच आपल्याला दुःख होते, अशी भावना प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त करीत ते या बंधवांसोबत बोलताना भावूक झाले.
श्री क्षेत्र पंचायतन मंदिरामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले बांधव स्वतःच्या तात्पुरत्या घरात जात आहेत याबद्दल समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही प्रितम म्हात्रे यांनी सांगितले. इर्शाळवाडी दुर्घटनेत आपले आई वडील गमावलेल्या अनाथ बालकांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी तसेच दुर्घटनाग्रस्त बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरी देण्याची जबाबदारी प्रितम म्हात्रे यांनी घेतली असून यावेळी या बांधवांवर कोणते संकट कोसळले आहे याची जाणीव आपल्याला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
इर्शाळवाडीवर कोसळलेल्या संकटात अनेक ग्रामस्थांनी आपली जिवाभावाची माणसे गमावली आहेत.मातीच्या खाली आतापर्यंत ५७ नातेवाईक अडकले आहेत.कुटुंबीयांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायचा प्रयत्न करत असलले ग्रामस्थ अक्षरशः या सगळ्या घटनेने कोलमडून गेले.राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाच्या मदतीसाठी शेरू आणि जॅकी असे दोन श्वान आघाडीवर होते, परंतु १५ ते २० फुटांच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधून काढण्यात तेही कमी पडले.
Post a Comment