News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पत्रकारांना दरमहा ११ हजार ऐवजी २० हजार रूपये निवृत्ती वेतनची घोषणा ..बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल करणार- मंत्री शंभूराज देसाई

पत्रकारांना दरमहा ११ हजार ऐवजी २० हजार रूपये निवृत्ती वेतनची घोषणा ..बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल करणार- मंत्री शंभूराज देसाई

मुंबई- विधानपरिषदेत आज पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विधानपरिषद सदस्य यांना काही सूचना केल्या होत्या. 

त्यानुसार आज खालील निर्णय घेण्यात आले...
९ मे रोजी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्त पत्रकारांना दरमहा ११ हजार ऐवजी २० हजार रूपये निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली आहे.मात्र त्याचा शासन निर्णय अजून जारी करण्यात आला नसल्याची बाब विधानपरिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी सभागृहात उपस्थित केली.यासंदर्भातील शासन निर्णय येत्या दोन दिवसांत जारी केला जाईल,अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली.

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेत निवृत्तीचे वय  ५८ आणि २५ वर्षे अनुभव असा निर्णय करण्यात यावा अशी मागणी विधानपरिषद सदस्य सुनिल शिंदे यांनी केली. त्यानुसार तातडीने निर्णय घेवून जाचक अटी कमी केल्या जातील असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिले.स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार सुवर्णमहोत्सवी कल्याण निधी हा ट्रस्ट असून यामध्ये सध्या ५० कोटींची तरतूद आहे. ( मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या प्रयत्नामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.) या निधी मध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

डिजिटल माध्यमांसाठी केंद्राचे जे निकष आहेत. ते तपासून त्या धर्तीवर डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले जाईल अशी घोषणा ही मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली.पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या डिसेंबर पर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
पत्रकारांचे प्रश्न पोटतिडकीने उपस्थित करणा-या सर्व विधानपरिषद सदस्य, मंत्री शंभूराज देसाई आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने मनःपूर्वक आभार मानले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment