सुनील तटकरेंच्या राजकीय खेळीने अनेक जण टेन्शन में... : तीन आमदारांतून एकालाही मंत्रीपद नाही,रायगडमध्ये शिंदे गटाची उडाली झोप
रोहा- (मिलिंद अष्टीवकर) राज्याच्या राजकारणात नैतिकता राहीली नाही. कोण कोणासोबत जाऊन सत्ता स्थापन करेल याचा नेम नाही.रविवारी संबंध राज्याने सत्तेसाठीचे भलतेच राजकारण पाहीले आणि कुठे संताप तर त्यातूनच मग कुठे विडंबन व्यक्त झाले.आता भाजपाप्रणीत सरकारात नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादी फुटीर गटातून खा सुनील तटकरेंच्या कन्या माजी मंत्री अदिती तटकरेंनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली आणि रायगडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
जिल्ह्यात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत, त्यातील एकालाही मंत्रीपद न मिळाल्याने रायगडच्या शिंदे गटाची अक्षरशः झोपच उडाली आहे. मंत्रीपदाच्या जवळ जाण्याच्या बढाया मारणाऱ्या आ.भरत गोगावलेंनाही परत रुमालच फिरवायला लावले आहे. दुसरीकडे तटकरेंची शरद पवार यांनी केलेली हकालपट्टी व त्यांचीच प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रफुल पटेलांनी केलेली निवडीने राष्ट्रवादी नेमकी कोणाची ? याप्रश्नी जिल्ह्यातिल कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.
राज्यात रविवारी वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे फडणवीस-शिंदे सरकारात सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले.पवार यांच्यासोबत गेलेल्या अनेक दिग्गजांत अपेक्षेप्रमाणे सुनिल तटकरेही सत्तेत सामील होऊन सत्तेसाठी कायपण हेच बेरजेचे राजकारण पुन्हा दाखवून दिले. राजकारणात सर्व बाजूंनी उभारी देणाऱ्या बॅ.ए.आर.अंतुले यांना दूर करत तटकरेंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या घटनेला रविवारी उजाळा मिळाला. काँग्रेसचा हात सोडत तटकरेंनी शरद पवारांचे घड्याळ हाती बांधले.आता त्याच पवारांना उतरत्या वयात सोडून सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या.यात तटकरेंनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले,आ.आदिती तटकरे पुन्हा मंत्री झाल्या आणि रायगडच्या राजकारणात भलतेच समीकरण चर्चेत आले. रायगडात राष्ट्रवादीचे केवळ एक आमदार असताना आधीच्या सत्तेत आणि आता मिळून दोन्ही वेळा मंत्रीपद मिळाले. सत्ता असो वा नसो आमचीच चलती राहणार हेच तटकरेंनी पुन्हा दाखवून दिले.
राज्यात आणि जिल्ह्यात
तटकरेंचे वर्चस्व कायम ...
राज्याच्या राजकारणात खा. सुनिल तटकरेंची चलती कायम राहिल्याचे दिसत आहे.सत्ता कोणाचीही असो वर्चस्व तटकरेंच राहणार हे पुन्हा स्पष्ट झाले. आ.गोगावले यांना मंत्रीपदाच्या जवळ जावू न देण्यात तटकरेच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.तटकरेंनी याच बेरजेच्या राजकारणात आधी राजकीय गुरु बॅ.ए.आर.अंतुले यांना सोडले,आता सत्तेसह सर्वकाही देणाऱ्या शरद पवारांनाही सुनिल तटकरेंनी आऊट केले,अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
राष्ट्रवादी नेमकी कोणाची,
तटकरेंचा पक्ष कोणता ? कार्यकर्ते संभ्रमात ....
शिंदे फडणवीस सरकारात राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत घरात मंत्रीपद घेतलेल्या तटकरेंची शरद पवार यांनी केलेली हकालपट्टी, दुसरीकडे त्यांचीच प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रफुल पटेलांनी केलेली निवड यावरून तटकरेंचा सध्यस्थितीत पक्ष कोणता, राष्ट्रवादी नेमकी कोणाची ? याचीही चर्चा सर्वत्र सुरू आहे. ठराविक नेतेमंडळी सोडली तर पक्षाचे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत.
बॅनर्सवरून शरद पवार झाले गायब! ......
शहारात कार्यकर्त्यांनी अदिती तटकरें यांचे अभिनंदन- करणारे बॅनर्स ठिकठिकाणी लागले आहेत या बॅनर्स मधून शरद पवार यांचे फोटो गायब झालेले दिसून येत आहे.
रोहयात ठाकरे-शिंदे गटासाठी
अवघड जागी दुखणे .....
शिंदे सरकार मध्ये राष्ट्रवादी बंडखोरांना सामावून घेतल्याने तटकरेंपासून कायम दुखावलेल्या शिंदे गटासाठी अवघड जागी दुखणे झाले. ठाकरे गटापाठोपाठ आता शिंदे गटाला सहनही होईना, सांगताही येईना, असेच तटकरेंच्या बेरजेच्या राजकारणाने केले आहे, मुख्यत: रोहा तालुका राजकारणात ठाकरे गटाचे प्रमुख समीर शेडगे, शिंदे गटाचे जोश असलेले तालुकाप्रमुख एड. मनोजकुमार शिंदे यांचे राजकीय भवितव्य काय असेल ? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.
शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांवर
ओढावली नामुष्की ..
शिवसेनेला जिल्ह्यात प्रथमच तीन आमदार मिळाले. तिन्ही आमदार एकनाथ शिंदेसोबत सरकारात गेले. मात्र एकालाही मंत्रिपद मिळाले नाही. शिंदे सरकारचे प्रतोद असणाऱ्या आ. गोगावलेंनाही मंत्रीपदाने कायम हुलकावणी दिली. मंत्री, पालकमंत्री मीच होणार असा ताठा करत रुमाल फिरवणाऱ्या गोगावलेंवर भलतीच वेळ आली. नंतर राष्ट्रवादीची सत्ता गेली, आदिती तटकरेंचे मंत्रीपद गेले, याच खुशीत असणाऱ्या शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांवर रविवार मोठीच नामुष्की ओढावली. सरकारात तटकरे सामील होत परत मंत्रीपद मिळवल्याने ठाकरे गटापाठोपाठ शिंदे गटालाही अवघड जागी दुखणे होऊन बसले आहे.
सुनील तटकरेंच्या राजकारणाने
अनेक जण टेन्शन में ...
रायगड राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या रोहा तालुक्यातील ठाकरे गटापाठोपाठ शिंदे गटही तटकरेंच्या बेरजेच्या राजकारणाने चांगलेच टेन्शनमध्ये आले.शिंदे गटाचे तालुकाप्रमुख एड. मनोजकुमार शिंदे हे मागील अनेक महिने खिशात निधी वाटपाचे चेकच घेऊन फिरत आहेत.आ.महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात शिंदे गट चांगलाच उभारी घेत होता, गाव,वाडीवस्त्यांना लाखोंचे निधी, पाणी योजनांना मंजुरी आणण्याचा सपाटा लावला. त्यातून अस्वस्थ होत चाललेल्या तटकरेंनी भाकरी फिरवली असल्याचे बोलले जात आहे. आधी रोहा येथील ठाकरे गटाला व आता शिंदे गटालाही जोर का झटका दिला आहे.
उलथापालथीकडे लागल्या नजरा .....
शिंदे फडणवीस सरकारात तटकरेंनी एन्ट्री केल्याने आता ठाकरे गट,पाठोपाठ शिंदे गटाचे अस्तित्व कुठवर राहणार ? हे समोर येणार आहे. कार्यकर्त्यांचे नेमके भवितव्य काय ? असा मिष्कील सवाल चोहोबाजूने उपस्थित झाला आहे. आता रायगडच्या राजकारणात अधिक काय काय उलथापालथी होतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment