"शासन आपल्या दारी" : ६०० हून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ
अलिबाग (जिमाका):- राज्य शासनाच्या "शासन आपल्या दारी" या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे व श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व म्हसळा तहसिलदार समीर घारे यांच्या पुढाकारातून तहसिलदार कार्यालयामार्फत म्हसळा तालुक्यातील नागरिकांसाठी पंचायत समिती कार्यालय, म्हसळा येथे शैक्षणिक दाखले, पीएम किसान योजना, ई-केवायसी, आधार अपडेशन, पोष्ट बँक खाते उघडणे, रेशनकार्ड देणे अशा विविध शासकीय लाभांबाबत एकदिवसीय विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात म्हसळा तालुक्यातील नागरिकांना १) दाखले (उत्पन्न दाखले, वय व अधिवास दाखले, नॉन क्रिमिलेयर दाखले, ईडब्ल्यूएस दाखले) एकूण २०४, २) पीएम किसान ई केवायसी करणे- एकूण ५०, ३) पोष्ट बँक खाते उघडणे - एकूण ३३७, ४) आधार कार्ड अपडेशन करणे- ०३, ५) शिधापत्रिका - एकूण १९२ या सेवा पुरविण्यात आल्या.
या शिबिराच्यावेळी म्हसळा नगरपंचायतीचे नगरसेवक, तहसिलदार कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी,पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक,पोलीस पाटील, कोतवाल,पोस्ट ऑफिसचे २० कर्मचारी, सेतू केंद्राचे कर्मचारी, सीएससी केंद्राचे कर्मचारी, स्टॅम्प वेंडर तसेच म्हसळा तालुक्यातील पत्रकार व प्रतिष्ठित नागरीक यांनी उपस्थित राहून हे शिबीर यशस्वी संपन्न होण्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले.
तालुका प्रशासनाच्यावतीने तहसिलदार श्री.समीर घारे यांनी सर्वाचे आभार मानले असून तालुक्यातील उर्वरित लाभार्थ्यांनी पीएम किसान ई केवायसी देखील करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment