दुर्गम भागात धडे गिरवून ओमकार ओंबळेने पटकावले दहावीत ९३ टक्के : ओमकारच्या या अपूर्व यशाचे सर्वस्तरातून कौतुक
कळंबोली (दीपक घोसाळकर): दहावीच्या परीक्षेत आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातल्या पाच्छापूर सारख्या दुर्गम भागात कोणताही खाजगी क्लास न लावता विद्यालयातल्या शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनावर व शिकवलेल्या धड्यातून शिक्षण घेऊन दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला येण्याचा मान ओमकार ज्ञानेश्वर ओंबळे या पट्ट्याने मिळवला आहे. त्याचे विद्यालय व संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व पेढा भरून अभिनंदन केले. दुर्गम भागातल्या या शाळेने शंभर टक्के निकाल लावण्याचाही बहुमान तालुक्यात मिळवला आहे.
सुधागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पाच्छापूर गावात सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर यांनी सुरू केले आहे. या विद्यालयात बहुजन वर्ग समवेतच आदिवासी विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेला २५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .या सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लावला आहे .या विद्यालयात शिकणाऱ्या ओमकार ज्ञानेश्वर ओंबळे यांनी कोणताही खाजगी क्लास व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन न घेता विद्यालयात दिले गेलेल्या शिक्षणाच्या धड्यांवर त्याने चांगला अभ्यास करून आपल्या आई-वडिलांनी केलेल्या श्रमाचे चीज करून ९३ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला येण्याचा बहुमताने पटकावला आहे. ओमकार चे वडील ज्ञानेश्वर ओंबळे हे शेतकरी असून त्याची आई नम्रता ज्ञानेश्वर ओंबळे ही अंगणवाडी सेविका आहे. मुलाने चांगले शिकून खूप मोठे व्हावे यासाठी ते आपल्या कष्टातून रक्ताचे पाणी करत आहेत. मात्र आई-वडिलांच्या असलेल्या कष्टाला सोन्यात रूपांतर करण्याची कीमया ओमकार ने करून दाखवल्याने पाच्छापूर सहित सुधागड तालुक्यात त्याने मिळवलेल्या अपूर्व यशाचे अभिनंदन केले जात आहे.विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी अपार कष्ट घेतले त्याचीच परिणीती म्हणून विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने विद्यालयाचा निकाल ही शंभर टक्के लागला आहे.अति दुर्गम भागात असलेल्या या शाळेला चांगल्या शैक्षणिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर हे अपार मेहनत घेत आहेत. पाच्छापूर हे गाव पालीपासून बारा किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. अद्यावत पद्धतीच्या कोणत्याही सोयी सुविधा या गावात नाहीत तरीही ओमकारने सर्व परिस्थितीवर मात करून यशाचा पल्ला गाठला आहे.
शाळेने सलग चार वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. शाळेत प्रथम क्रमांक ओमकार ज्ञानेश्वर ओंबळे ९३ %, द्वितीय क्रमांक मीनाक्षी यशवंत कोकळे ८० % ,तृतीय क्रमांक पांडुरंग रघुनाथ बावदाने ७५ %, चतुर्थ क्रमांक किरण सावळाराम कोकरे ७४ % ,पाचवा क्रमांक विशाल गुणाजी लेंडी ७१ % असे गुण प्राप्त केले आहेत.संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर ,मुख्याध्यापक दीपक उत्तम माळी तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment