शाळा आपल्या दारी : शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुधागड विद्यालयाचा शैक्षणिक उपक्रम
कळंबोली - नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलातील प्राथमिक शिक्षकांनी शाळा आपल्या दारीचा अभिनव उपक्रम राबवून शाळाबाह्य विद्यार्थी शोधून काढले.यासाठी कळंबोलीतील मराठी प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका हेमलता पाटील व त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी कळंबोली वसाहती मधील विविध भागात फिरून विद्यार्थी शोध मोहीम घेऊन शाळेत न जाणारे विद्यार्थी शोधून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.या शिक्षकांचे विद्या संकुलाच्यावतीने अभिनंदन ही करण्यात येत आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वसंधेला कळंबोली विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या सर्वच शिक्षकांनी विद्यार्थी शोध मोहीम हाती घेतली .यावेळी विद्यालयातील शिक्षक एलआयजी.ए टाईप ,जाधव वाडी तसेच विविध भागात फिरून शैक्षणिक अडचणीमुळे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून काढले.यावेळी तब्बल ८० विद्यार्थी हे शाळेत न जाणारे मिळून आले .
या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील यांनी शिक्षकांना सूचना देऊन त्यांना विद्यालयात दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.यासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.शोधून काढण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी कळंबोली विद्या संकुलामध्ये विविध विभागात सामावून घेतले जाणार आहे.
Post a Comment