नवीन पनवेलच्या फडके विद्यालयात आजी-आजोबांनी अनुभवली वारकरी नातवंडांची दिंडी : अवघी शाळाच भक्तीरसात तल्लीन
पनवेल- वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर, अशा विठ्ठलमय वातावरणात चिमुकल्यांची शाळा भरली... 'पायी हळूहळू चाला, मुखाने पांडुरंग बोला...' असे म्हणत ही चिमुकली मंडळी विठूरायाच्या जयघोषात तल्लीन झाली.नवीन पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त खास चिमुकल्यांची दिंडी काढण्यात आली.
यावेळी लेझिमच्या तालावर या चिमुकल्यांनी ताल धरला. ज्याप्रकारे वारकरी देहभान हरपून वारीत सहभागी होत असतात अगदी त्याचप्रमाणे ही चिमुकली मंडळीसुद्धा दिंडी सोहळ्यात सहभागी झाली.विठ्ठल रखुमाईची सुबक मूर्ती,केशरी झेंडा,तुळशीचे रोप घेऊन ही चिमुकली मंडळी दिंडीत टाळमृदुंगाच्या गजरात चालताना दिसली.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले आज मात्र पांढरा झब्बा,डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि मुली नऊवारी साडी, केसात गजरा माळून आली होती. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून अवघी शाळाच भक्तीरसात तल्लीन झाल्याची पाहायला मिळाली. या भक्ती पूर्ण उत्सवाचे निमित्त साधून विद्यालयाने यावर्षी या चिमुकल्यांच्या आजी-आजोबांना व घरातील जेष्ठांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास उस्फूर्त प्रतिसाद देत एकूण ८०-९० आजी-आजोबांनी अत्यंत उत्साहात आपली उपस्थिती नोंदवली तसेच विद्यालयास शुभेच्छा देऊन आजी आजोबा व नातवंडे यांच्यातील दुवा घट्ट करण्याचे काम केल्याबद्दल कौतुक केले.
यानिमित्ताने विद्यालयात श्लोक म्हणण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात यावर्षीचा आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला.
Post a Comment