पनवेल महानगरपालिकेची ऑनलाईन मालमत्ता कर देयके देण्यास सुरूवात
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी सर्व मालमत्ता धारकांस ऑनलाईन पध्दतीने व प्रत्यक्ष मालमत्ता कराची देयके बजावण्यात येत आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातील ज्या मालमत्ता धारकांना अद्यापपर्यंत मालमत्ता कराची देयके प्राप्त झालेली नाहीत, त्या मालमत्ता धारकांनी panvelmc.org किंवा PMC TAX app वर नोंदणी करुन ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराची देयके डाऊनलोड करुन घ्यावीत असे पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, ज्या मालमत्ता धारकांना ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन मालमत्ता कराची देयके प्राप्त करुन घेणे शक्य नाही अशा मालमत्ता धारकांनी मुख्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयामधून देयके उपलब्ध करुन घ्यावीत.
मा. उच्च न्यायालयाने मालमत्ताकर विरोधातील खारघर फेडरेशनची याचिका फेटाळण्याचा निर्णय दिल्यानंतर, कर दात्यांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढलेला दिसून येत आहे. आजच्या दिवशी करदात्यांनी सुमारे 3 कोटीचा मालमत्ता कर भरलेला दिसून आला. यावरूनच कर दात्यांमध्ये स्वत:हून मालमत्ता कर भरण्याची प्रेरणा वाढलेली दिसून येत आहे.
सर्व मालमत्ता धारकांनी आपली देयके ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्दारे प्राप्त करुन घेऊन, मालमत्ता कराचा भरणा लवकरात लवकर करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पनवेल महानगरपालिकेकडून केले आहे.
Post a Comment