पनवेल महानगरपालिकेचे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे पाऊल ...
जनता दरबारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली सूचना
पनवेल महानगरपालिकेचे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे पाऊल ...
पनवेल : पनवेलमध्ये अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार झाला.या जनता दरबारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पनवेल महानगरपालिकेला इंग्रजी शाळा सुरू कराव्यात अशा सूचना केल्या होत्या, सद्यःपरिस्थितीत पनवेल महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा प्रस्ताव तयार केला असून तो येत्या महासभेत सादर केला जाणार आहे.
सध्या पनवेल महानगरपालिकेमार्फत 11 शाळा चालविण्यात येत आहेत. या शाळांपैकी 8 मराठी माध्यम, 2 उर्दु आणि 1 गुजराती शाळा सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत महापालिकेची एकही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली नव्हती. खाजगी इंग्रजी माध्यामांच्या शाळांची फी भरणे अर्थिक दृष्ट्या गरीब पालकांना शक्य नसते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील आर्थिक द्ष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण नि:शुल्क मिळावे या हेतूने आयुक्तांनी इंग्रजी माध्यामाची शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेतून वारंवार मागणी होत असल्याने पालिकेने पूर्व प्राथमिक ते इयत्ता 10 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. इंग्रजी माध्यमाची ही शाळा या वर्षापासूनच सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये पूर्व प्राथमिकच्या ज्युनिअर के.जीच्या वर्गापासून सुरूवात करून दरवर्षी पुढील इयत्तांचे एक-एक वर्ग वाढविण्यात येणार आहेत.
नव्याने प्रस्तावित या शाळेचा सर्व खर्च महापालिकेला स्वत:च्या निधीतून करावा लागणार आहे. सुरूवातीच्या पूर्व प्राथमिक शाळा तसेच इयत्ता 1 ली पासूनचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे आवयश्यक असणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने हा प्रस्ताव तयार केला असून, हा प्रस्ताव येत्या महासभेत महापालिका सदस्यांसमोर मांडण्यात येणार आहे.
Post a Comment