अटल करंडक : होतकरू रंगकर्मींसाठी मोठी संधी- अभिनेते मकरंद अनासपुरे
अटल करंडक : होतकरू रंगकर्मींसाठी मोठी संधी- अभिनेते मकरंद अनासपुरे
पनवेल- श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरुवात झाली आहे.
नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून महाअंतिम फेरीचे उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने, सहप्रायोजक नील ग्रुपच्या कल्पना कोठारी आदी उपस्थित होते.
या एकांकिका स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते संजय मोने यांनी स्पर्धेविषयी व्यक्त केलेले मत....
परीक्षक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी, अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले. आदर्शवत असं नियोजन स्पर्धांचे आयोजन इथे अनुभवायला मिळाल्याचे सांगितले. हे आयोजन असेच पुढे चालू राहू द्या अशा शुभेच्छा दिल्या.
सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी बोलताना, ही अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होतकरू रंगकर्मींसाठी मोठी संधी आहे. दोन वर्षाच्या कोविड काळानंतर रंगमंचावर स्पर्धा होत आहेत. एकांकिका स्पर्धा रंगकर्मी आणि प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी आहे. अतिशय निट-नेटच्या पद्धतीने शिस्तबद्ध नियोजन अशी ही स्पर्धा प्रेक्षकांमध्ये उत्साह आणत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाटककार विजय केंकरे यांनी, या एकांकिका स्पर्धांमध्ये वेगवेगळे दिग्दर्शक, वेगवेगळे नाटककार, वेगवेगळे अभिनेते पाहायला मिळतात, हीच आमची पुढची पिढी असल्याचे त्यांनी सांगितले. एकांकिका स्पर्धा हा एक असा मंच आहे की लोक वेगवेगळे विषय बिनदिक्कत हाताळू शकतात. आपल्या मनात काय चालू आहे हे मांडू शकतात,हे केवळ अशा एकांकिका स्पर्धातूनच होतं असे सांगितले.
Post a Comment