सातारा येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन .. दुर्दैवाने मला शरद पवार यांच्या पक्षात जाता आलं नाही पण त्यांचा आदर्श कायम ठेवत मी काम करत आहे - रामशेठ ठाकूर
सातारा येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे
खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन ..
दुर्दैवाने मला शरद पवार यांच्या पक्षात जाता आले नाही पण त्यांचा आदर्श कायम ठेवत मी काम करत आहे
- रामशेठ ठाकूर
सातारा- सातारा येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.
या समारंभाला खासदार श्रीनिवास पाटील,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, कायदेशीर सल्लागार ॲड. दिलावर मुल्ला,लोकनेते रामशेठ ठाकूर,सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी, कर्मवीर अण्णा यांचे विचार आदर्श होते,समाजाला नवी दृष्टी देण्याचे काम त्यांनी केले आहे. कर्मवीर अण्णांच्या विचारांचा पगडा रामशेठ ठाकूर यांच्यावर आहे.रयत शिक्षण संस्थेच्या प्रकल्प- उपक्रमांमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगून रामशेठ ठाकूर हे कमी बोलणारे आणि अधिक काम करणारे व्यक्तिमत्व आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक प्रकल्पांसाठी त्यांच्या मुखातून मदतीसाठी कधी नकार येत नाही.रयत शिक्षण संस्थेच्या कामात नकार नावाची भूमिका आजपर्यंत यांनी घेतली नाही. रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळांसाठी आतापर्यंत केलेल्या कोटींच्या कोटी रुपयांच्या मदतीची यादीच शरद पवार यांनी जाहीर व्यासपीठावरून वाचून दाखवली.
यावेळी रामशेठ ठाकूर यांनी, रयत शिक्षण संस्था हे माझे घर आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव कसे मोठे होईल अशा पद्धतीने सर्व जण काम करत आहेत. माझ्यात पैलू पाडण्याचे काम खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेने केले आहे. आजचा कार्यक्रम हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे.दुर्दैवाने मला शरद पवार यांच्या पक्षात जाता आले नाही पण त्यांचा आदर्श कायम ठेवत मी काम करत असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची भाषणे झाली
Post a Comment