योगव्रती 'बाबा'!
योगव्रती ‘बाबा’!
गेली 32 वर्षे पनवेलकरांना निरामय आरोग्याचा ‘योगमंत्र’ देत, त्यांना फिट अॅन्ड फाइन ठेवण्याचा वसा घेतलेले योगकेंद्राचे संस्थापक, संचालक पु. ल. भारद्वाज अर्थातच समस्त पनवेलकरांना बाळासाहेब भारद्वाज आणि तमाम योगप्रेमींना ‘बाबा’ या नावाने सुपरिचित असलेल्या बाबांचे मंगळवारी (दि. 21) अल्पशा आजाराने पनवेल येथे निधन झाले.
वय वर्षे अवघे 96 असलेले बाबा किरकोळ आजार वगळता अगदी तंदुरुस्त होते आणि शंभरीच काय शंभरीच्याही पुढे वाटचाल करतील अशीच सर्वांची अटकळ होती, पण नियतीच्या मनात काही वेगळंच असावं. मुंबईच्या योगविद्या निकेतनचे संस्थापक योगाचार्य पद्मश्री सदाशिवराव निंबाळकर यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्या आणि त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन पनवेलमध्ये योग केंद्र स्थापन करणार्या भारद्वाज यांनी निवृत्तीनंतर आराम न करता 32 वर्षांपूर्वी आपल्या शहरातही एक योग केंद्र असावं असं स्वप्न पाहिलं. फिटनेसचं महत्त्व आज लोकांना कळलंय पण भारद्वाज यांना योग आणि मानसिक-शारीरिक स्वास्थ्याचं महत्त्व 32 वर्षांर्पूर्वीच उमगलं होतं.
योगविद्या निकेतन येथे योगविद्येचे प्रशिक्षण घेऊन मोजक्या सहकार्यांसह त्यांनी 1989 मध्ये पनवेलच्या योग केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. आज या रोपाचं रूपांतर मोठ्या वटवृक्षात झालं आहे.
Bआज 50 समर्पित, निष्ठावान योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास आणि सूर्यनमस्कारांचे 15 वर्ग सुरू आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी जिथे योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेतले आणि घेत आहेत त्याला योग केंद्र नाही, खरं तर ‘योग विद्यालय’च म्हणायला हवं. या उत्तुंग यशाचे मानकरी आहेत दूरदर्शीपणा, वक्तशीरपणा, सातत्य, चिकाटी अशा अनेक गुणांनी युक्त असणारे आणि ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे वचन सार्थ करणारे भारद्वाज सर. त्यांनी ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ हा प्रकार केला नाही. ते स्वतः योगाभ्यासी आहेत, हे त्यांच्या हालचाली, उत्साह आणि एकूणच फिटनेस पाहून समजून येई. योगाभ्यासाचे फायदे त्यांच्याकडे बघूनच लोकांना कळे. योग आणि आरोग्याला वाहिलेले ‘योगसखा’ हे मासिक योग केंद्रातर्फे गेली 18 वर्षे सातत्याने आणि न चुकता दर एक तारखेला प्रकाशित होत आहे. कोणतीही गोष्ट सुरू करणे सोपे असते, ती टिकविणे, त्यात दर्जा राखणे खूप अवघड असते. पण बाबा त्याच उत्साहाने त्याचे संपादन करीत असत.
लेखकांकडून लेख मागविणे, ते छपाईसाठी प्रेसमध्ये देणे, लेखांचे प्रूफरीडिंग करणे ही कामे ते अगदी काल-परवापर्यंत मोठ्या उत्साहाने करीत असत. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे बाबांनी कृतीने दाखवून दिले. त्यांच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची सकारात्मक दृष्टी. एखादं काम, कार्यक्रम, योजना त्यांनी ठरवली की ती ते पूर्ण करणारच. सबबी सांगणे, ढिलाई त्यांना आवडत नसे. एखादी कल्पना मांडण्यापूर्वी त्यांनी तिचा सर्व अंगांनी विचार केलेला असे त्यामुळे त्या योजनेच्या यशस्वीतेषियी कुणी शंका उत्पन्न केलीच, तर त्यावर त्यांच्याकडे उपाय, मार्ग असायचाच. ‘योगविद्या गावोगावी’ हे ब्रीदवाक्य आणि ‘योग साक्षरता’ हे ब्रीद मूर्तरूपात आणताना त्यांनी योगकेंद्राच्या कक्षा आपल्या अविश्रांत कष्टातून पेण, उरण, कर्जतपर्यंत विस्तारल्या.
पनवेल परिसरातील तब्बल 130 शाळांमध्ये योगविद्या व सूर्यनमस्काराची ओळख करून देऊन आरोग्यसंपन्न समाजाच्या घडणीत त्यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. मात्र या सगळ्याचं श्रेय ते नेहमीच शिक्षकांना देत हा त्यांचा मोठेपणा. कुठलाही कार्यक्रम वेळेवरच सुरू व्हावा आणि वेळेतच संपवावा हा त्यांचा कटाक्ष नव्हे दंडक असे म्हणून एरवी कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा जाणारे पाहुणे, वक्ते योग केंद्राच्या कार्यक्रमाला सहसा उशीर करीत नाहीत. भारद्वाज सरांचा हा जो धाक होता तो खूप बोलका होता. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शाळा-कॉलेजातील 5,000 विद्यार्थ्यांच्या सूर्यनमस्कार महाशिबिराचं स्वप्न पाहिलं. नुसती स्वप्ने बघून भागत नाही, ती पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्टही घ्यावे लागतात.
प्रथम आपले स्वप्न त्यांनी कार्यकर्त्यांनाही दाखवलं, त्याचे मोल पटवून दिले आणि संपूर्ण योग केंद्र झपाट्याने कामाला लागले. योग शिक्षकांची टीम घेऊन ते स्वत: शाळा-कॉलेजांमध्ये गेले आणि विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारांचे प्रशिक्षण दिलं. उन्हातान्हाची पर्वा न करता, न कंटाळता, न थकता किमान चार-पाच वेळा प्रत्येक शाळेत ते गेले आणि अखेर तो स्वप्नपूर्तीचा दिवस उजाडला. त्या रम्य सकाळी पनवेलकरांना एक अभूतपूर्व दृष्य पहायला मिळाले. पनवेलच्या मिडल क्लास सोसायटीचे भव्य मैदान शाळा-कॉलेजच्या तब्बल 5,000 विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते.
आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, अनेक नगरसेवक आणि शेकडो प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत हे महाशिबिर उत्साहात पार पडले. पनवेलसाठी हा खरोखरच सुवर्णक्षण होता. कुठेही गडबड, गोंधळ नाही. सर्व काही नियोजनबद्ध, आखीव रेखीव. हल्लीच्या दिवसात कुणीही आपली खुर्ची, आपले पद सोडायला तयार होत नाही. पण भारद्वाज सर सूर्यकांत फडके यांच्यासारख्या तितक्याच तळमळीच्या व्यक्तीला उत्तराधिकारी नेमून कधीच मोकळे झाले होते. उत्तम अनुयायी तयार करणं हे भारद्वाज आणि योग केंद्राचे मोठे यश आहे. एखादी संस्था उभी करणं सोपं आहे, तिची वाढ, भरभराट करणेही फारसे अवघड नाही. पण या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांची दुसरी फळी आणि पर्यायी सक्षम नेतृत्व तयार करणे ही मोठी जमेची बाब आहे. योग केद्राच्या प्रत्येक उपक्रमासाठी अतोनात परिश्रम घेणारे, उत्साही, सक्षम योग शिक्षक व कार्यकर्ते आज योग केंद्राची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलत आहेत.
योगाभ्यासाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणे, शिस्त आणि वक्तशीरपणा बाळगून, त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरुन मार्गक्रमण करणे हीच भारद्वाज सरांना श्रद्धांजली ठरेल. मला खात्री आहे योगाभ्यासामुळे स्वत:ला फिट अॅन्ड फाईन राखणारे हजारो पनवेलकर भारद्वाज यांच्या कायम ऋणातच राहतील. भारद्वाज यांना तमाम योगप्रेमींच्यावतीने आदरांजली...!
- जयंत टिळक
Post a Comment