News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिक्षक दिनानिमित्त विशेष मुलांच्या शिक्षकांचा रोटरी क्लबतर्फे विशेष सन्मान

शिक्षक दिनानिमित्त विशेष मुलांच्या शिक्षकांचा रोटरी क्लबतर्फे विशेष सन्मान

पनवेल - रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन (RCPIT) तर्फे शिक्षक दिनानिमित्त विशेष मुलांच्या शिक्षण, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा रोटरी कम्युनिटी सेंटर,नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आला.

विशेष मुलांच्या दैनंदिन शैक्षणिक व इतर उपक्रमांमध्ये शिक्षकांना सहकार्य करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदानही महत्त्वाचे असते.त्यांच्या सहकार्याची आणि सेवाभावाची दखल घेत यावेळी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास RCPITच्या अध्यक्षा रो.डॉ.जयश्री पाटील, सचिव रो.ॲड.हितेश राजपूत, RCPIT चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन रो.अरविंद सावळेकर,श्रीमती राधाबाई खेमचंद परमार कर्णबधिर विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शैला बंदसोड, तसेच क्लब सदस्य रो.प्रकाश आर.पाटील,रो.बी. जी.पाटील,रो.महेंद्र उरणकर,शाळेतील विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लब सचिव रो.ॲड.हितेश राजपूत यांनी केले.त्यांनी विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करताना,त्यांच्या कार्यामागील संयम,संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले.

RCPIT चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन रो.अरविंद सावळेकर यांनी मनोगत व्यक्त करून विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम केला.विशेष मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षा रो.डॉ.जयश्री पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून विशेष शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी शिक्षक करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षकांचे कार्य हे समाजाच्या भविष्यात गुंतवणूक करणारे कार्य असून,त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सन्मानित झालेल्या शिक्षिकांनीही आपले मनोगत व्यक्त करून रोटरी क्लबचे आभार मानले.५ सप्टेंबर हा शिक्षकांसाठी विशेष दिवस असून, त्या निमित्ताने आपल्या कार्याची दखल घेऊन करण्यात आलेला हा सन्मान आपल्यासाठी विशेष आणि प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष मुलांसोबत काम करताना मिळणारे समाधान आणि त्यांच्या प्रगतीतून मिळणारा आनंद हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष मुलांना घडविणाऱ्या शिक्षकांचे कार्य हे केवळ वर्गखोलीतील अध्यापनापुरते मर्यादित नसून, त्यांच्या क्षमतांना ओळख देणे,त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, या व्यापक जबाबदारीशी जोडलेले आहे. अशा समर्पित शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्याचा रोटरी क्लबचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता क्लब सचिव रो.ॲड.हितेश राजपूत यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment