News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कामोठेत रंगणार 'मिनी महाराष्ट्र केसरी' .... नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” भव्य जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन

कामोठेत रंगणार 'मिनी महाराष्ट्र केसरी' .... नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” भव्य जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडाप्रेमींसाठी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी कामोठे मधील सेक्टर ०६ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर “मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी २०२६” या भव्य जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज(दि. १५) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आली. महाराष्ट्र केसरी प्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन असल्याने कामोठेत मिनी महाराष्ट्र केसरी रंगणार आहे आणि त्या अनुषंगाने कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. 

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक दिनेश खानावकर, सुमित झुंझारराव,  आयोजक पनवेल महापालिकेचे नगरसेवक हॅप्पी सिंग आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर  कुस्ती प्रशिक्षक रुपेश पावशे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

कुस्ती सामन्यांच्या संदर्भात पुढे माहिती देताना परेश ठाकूर यांनी सांगितले कि, या सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार महेश लांडगे यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे,  भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील,पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नविन पनवेल  मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व  मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पश्चिम  मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे. 

वाढदिवसानिमित्त कार्यक्रमातून प्रेरणा मिळावी यासाठी सामाजिक उपक्रम राबविले जातात. पनवेलमधील नागरिकांना राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती सामने प्रत्यक्ष अनुभवता यावेत, महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे. दरवर्षी हजारो क्रीडाप्रेमी या स्पर्धेला उपस्थित राहून मातीतील थरार अनुभवतात.  या स्पर्धेत महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी तसेच महिला कुस्तीपटूंचे विशेष सामने हे यंदाच्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची पारितोषिके असणार असून यामध्ये प्रामुख्याने पुरुष गटात रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै. लाली चमकोर, उपमहाराष्ट्र केसरी पै.किरण भगत विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै.बागा सिंघ, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी पै.संदीप कुमार, महाराष्ट्र केसरी  पै. दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.माउली कोकाटे यांचे तर महिला गटात पै.अमेघा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पै.एकता शर्मा, राष्ट्रीय पदक विजेती पै.पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.वेदांतीका पवार आणि नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पै.रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची सुप्रसिद्ध पै. कोमल यांच्यामध्ये सामने होणार असल्याचे परेश ठाकूर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या मल्लांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण ७५ सामने होणार असून स्थानिक मल्लांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. दर्जेदार मैदान, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, वैद्यकीय तसेच आवश्यक अशा सर्व सुविधा या ठिकाणी असणार असल्याची माहिती परेश ठाकूर यांनी यावेळी दिली. 

परेश ठाकूर यांनी पनवेल आणि रायगड परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. युवकांना सक्षम व्यासपीठ मिळावे, ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी मिळावी आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी विविध उपक्रमांना कायम प्रोत्साहन दिले आहे. पनवेल परिसरातील युवकांना सामाजिक कार्य, नेतृत्व आणि संघटन कौशल्याची प्रेरणा देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.  विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली आपुलकी आणि समाजाशी असलेले घट्ट नाते हीच त्यांची खरी ओळख मानली जाते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सामाजिक वारसा समर्थपणे पुढे नेत असताना सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि माणुसकीची जपणूक हा परेश ठाकूर यांचा पिंड आहे. “समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकास आणि संस्कारांची परंपरा जपणे” ही त्यांची भूमिका अनेक उपक्रमांतून सातत्याने दिसून येते. त्यामुळेच पनवेल परिसरात त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आणि विश्वास आहे. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे  परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा आज पनवेल तालुक्यातील एक प्रतिष्ठेचा आणि सर्वांच्या आकर्षणाचा क्रीडा महोत्सव बनली आहे. कुस्ती या महाराष्ट्राच्या पारंपरिक खेळाबद्दल असलेले त्यांचे विशेष प्रेम, खेळाडूंप्रती असलेला जिव्हाळा आणि क्रीडा क्षेत्राला दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळे “मा.श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” कुस्ती स्पर्धेला राज्यभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कुस्ती हा केवळ खेळ नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा आत्मा आहे, ही भावना जपत परेश ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती खेळाला भक्कम पाठबळ दिले आहे. ग्रामीण भागातील अनेक नवोदित मल्लांना त्यांनी आर्थिक, सामाजिक आणि नैतिक आधार देत त्यांच्यातील गुणवत्ता राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, त्यांना केवळ कुस्तीच नव्हे तर क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, बॉडीबिल्डिंग यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांविषयीही विशेष आत्मीयता आहे. त्या अनुषंगाने पनवेल आणि रायगड परिसरातील अनेक खेळाडूंना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना खेळाच्या मोठ्या स्तरावर झेप घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या दर्जेदार व भव्य स्वरूपातील कुस्ती सामन्यांचा कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक पनवेल महापालिकेचे नगरसेवक हॅप्पी सिंग आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment