संपत्ती स्थानिकांची,तुंबड्या भरल्या अधिकार्यांनी ...भ्रष्ट्राचाराला रोखण्यासाठी जागे व्हा ; लाचखोर मंडळ अधिकारी प्रकरणातील तक्रारदार निलेश पाटील यांचे आवाहन
पनवेल- ः पनवेल शहरातील पर्डी क्रमांक 74 अ या 4.22 गुंठे जमिन मालकाचे नाव सातबार्यावर चढविण्यासाठी तब्बल 1 लाख रूपयांची लाच मागणारा गजाआड झाला. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांच्या तक्रारीमुळे लाचखोरीचा भस्म्या झालेला मंडल अधिकारी गोवर्धन माने 30 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला. परंतू केवळ महसूल विभागात हा भ्रष्ट्राचार नाही तर पनवेल तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे.महानगरपालिका, सिडको,अप्पर तहसिलदार,पनवेल भूमिअभिलेख, प्रांत, सब रजिस्टार ऑफिस आदी कार्यालये भ्रष्टाचाराने पोखरलेली आहेत.पनवेल तालुक्यातील बापजाद्यांच्या कमाईतून मिळवलेल्या जमिनीवर सरकारी अधिकार्यांचा डोळा असून शेकडो अधिकार्यांनी सोन्याच्या तुंबड्या भरल्या आहेत.काम फुकट करण्याची जबाबदारी असलेले अधिकारी प्रत्येक काम पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत असा आरोप निलेश पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.आमच्या हक्काच्या कामासाठी पैसे का द्यायचे असा प्रश्न विचारल्याशिवाय गोरगरीब शेतकर्यांची कामे होणार नाहीत. पैशासाठी कोणाचे काम अडविले जाणार असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आवाहन निलेश पाटील यांनी केले.सातबारावर नाव नोंदविण्यासाठी निलेश पाटील यांनी पनवेलच्या तहसिलदार मिनल भामरे यांनी नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज केला होता. डिसेंबर किंवा जानेवारीत हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतू संबंधित जागेची किंमत कोट्यवधी रूपये आहे, त्यामुळे याकामासाठी 1 लाख रूपये लागतील अशी मागणी केली. माझी प्रॉपर्टी किती कोटींची आहे, यांच्याशी मंडल अधिकारी गोवर्धन माने यांचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करून पैसे देण्यास निलेश पाटील यांनी नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे माने याने थम्ब इंप्रेशनचे काम जाणिवपुर्वक रखडविले.अखेर तड़जोडीअंती सुरूवातीला 50 हजार आणि 30 हजारात माने काम करण्यास तयार झाला. त्यामुळे रायगड लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात माने अडकला. सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रकार पनवेलमध्ये नवीन नाही. पनवेल तालुका म्हणजे सरकारी अधिकार्यांसाठी अक्षरश सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे.पनवेलमध्ये पोस्टिंग मिळवण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक म्हणजेच वरिष्ठ कार्यालयाला पैसे द्यायचे,आणि पोस्टींगसाठी गुंतवलेली रक्कम दामदुप्पटपणे वसुल करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची कामे अडवून भ्रष्टाचाराच्या मार्गाने वसूल करायची. यासाठी स्थानिक जमिनदार, वारसदारांची पिळवणूक सुरू आहे.यामुळे पनवेलमधील जमीनमालक हतबल झाला आहे. अनेक गरीब शेतकर्यांची कामे लाच देण्यासाठी पैसे नसल्यामुळे अडकलेली आहेत. विकासकामांच्या नावाखाली कमिशनखोरी, परवानग्यांसाठी दलाली, फाईल हलवण्यासाठी पैशांची मागणी आणि कंत्राटांमधील गैरव्यवहार यामुळे प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे. झपाट्याने वाढणार्या विकासाचा फायदा स्थानिकांना मिळण्याऐवजी भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्यांना होतो आहे. सामान्य नागरिक मात्र कर भरून, सरकारी शुल्क भरून आणि हेलपाटे मारून थकला आहे.
पनवेलमधील एकही सरकारी कार्यालय याला अपवाद नाही. उलट इतर तालुक्यांपेक्षा पनवेल, उरण आणि आसपासच्या तालुक्यातील विकासामुळे लाचेचा दर देखील चढा आहे. याला आळा घालायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी जागे होण्याची गरज आहे. पैसे मागणार्या अधिकार्यांविरोधात आवाज उठवून संबंधितांना धडा शिकवल्याशिवाय हे थांबणार नाही. मी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आमदार विक्रांतदादा पाटील यांची भेट घेवून याबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी करणार असल्याचे निलेश पाटील यांनी सांगितले. नागरिकांना सरकारी कार्यालयातील कामकाजात काही अडथळे आल्यास माझ्याशी 9867779777 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
Post a Comment