बंद केलेली प्राथमिक शाळा सुरू करण्यासह आंगणवाडीच्या मागणीसाठी १ एप्रिलपासून कोरलवाडीतील आदिवासींचा पनवेल पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
पनवेल - रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोरळवाडी व दाभोळवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात तीव्र संताप व्यक्त करत दिनांक १ एप्रिल २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.एका बाजूला शासनाने कोरलवाडी मध्ये असलेली १ ली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा बंद करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला आहे तर दुसरीकडे कोरलवाडी आणि दाभोळवाडी या दोन्ही आदिवासी वाड्यांमध्ये सुमारे दहा महिन्यांपूर्वी आंगणवाड्या मंजूर होऊन कार्यारंभ आदेशही देण्यात आले असताना पेण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून वन जमीन हस्तांतरण प्रस्ताव मंजूर न झाल्याने अद्याप कामही सुरू झाले नसल्याने लहान बालकांना आवश्यक सुविधा व सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने आदिवासी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आजूबाजूला जवळ शाळा नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवर जावे लागत असल्याने त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात आदिवासी ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे लेखी व तोंडी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून रायगडभूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.१ एप्रिल २०२६ पासून पंचायत समिती पनवेल कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सुवर्णा वाघे,सोनाली पवार,प्रगती वाघे,रुचिता पवार यांनी दिली असून सदर उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही आदिवासी बांधवांनी दिला आहे.
Post a Comment