सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या घरांच्या किमतींमध्ये १० टक्के दर कपात .....आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!
नवी मुंबई/पनवेल — सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या घरांच्या किमतींमध्ये १० टक्के दर कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
अनेक गोर-गरीब लॉटरी धारक नागरिकांच्या आशा या निर्णयाकडे लागून राहिल्या होत्या.हजारो नागरिकांनी आपल्या भावना आमदार विक्रांत पाटील यांच्याकडे वारंवार व्यक्त केल्या होत्या.आजच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.
‘हाऊसिंग फॉर ऑल’ या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी धोरणाला अधिक बळ देण्यासाठी EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि LIG (कमी उत्पन्न गट) या दोन्ही प्रवर्गांतील घरांच्या दरांमध्ये ही कपात लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होणार आहे.
सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतींबाबत आमदार विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात ठाम भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले होते. अवास्तव दरांमुळे सामान्य नागरिक घरापासून दूर जात असल्याचा मुद्दा त्यांनी ठळकपणे मांडत, दरकपात करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती.त्यांच्या याच पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे नवी मुंबई,पनवेल व परिसरातील हजारो लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असून,सिडकोच्या घरांसाठीची मागणीही वाढण्याची शक्यता आहे.आमदार विक्रांत पाटील यांनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत, “सर्वसामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरकपातीच्या या निर्णयामुळे ‘हाऊसिंग फॉर ऑल’ हे धोरण प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असल्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.आमदार विक्रांत पाटील यांनी लढलेल्या लढ्याबद्दल लॉटरी धारकांनी त्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment