अखेर सिडको प्रशासन जागे... पनवेल तालुक्यातील चिपळे पूल ते नेरे रस्त्याच्या कामाला लवकरच होणार सुरुवात
पनवेल (प्रतिनिधी) सिडकोच्या नैना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चिपळे पूल ते नेरे रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात अखेर सिडको प्रशासन जागे झाले असून, या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. या विषयी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे लक्ष वेधून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नागरिकांचा हा प्रश्न निकाली लागला आहे.
चिपळे पूल ते नेरे हा अत्यंत महत्त्वाचा आणि दररोजची रहदारी असलेला रस्ता असून, सध्या त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. यापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता, मात्र त्याचे सिडकोकडे हस्तांतरण झाल्यानंतर तो नैना हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या भागांमुळे नागरिकांची ये-जा अत्यंत धोकादायक व त्रासदायक झाली आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये सिडकोविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिकांची मागणी आणि त्यांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत, आमदार ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन देऊन सिडको अधिकाऱ्यांना या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. तसेच हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असल्याने त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यानुसार सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे भाजपचे पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांना सांगितले. यामुळे प्रवाशी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Post a Comment