मुंबईतील इक्षु शिंदे यांना ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ सन्मान ...अमेरिकेतील गॅरीबे इन्स्टिट्यूटतर्फे गौरव
पनवेल : :-- मुंबईतील विद्यार्थिनी इक्षु शिंदे यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा, सामाजिक सहभागाचा आणि कला-क्षेत्रातील बहुआयामी योगदानाचा उत्तुंग ठसा उमटवत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अमेरिकेतील The Garibay Institute for Soft Power and Public Diplomacy या प्रतिष्ठित संस्थेमार्फत त्यांची Global Future Scholar & Diplomat म्हणून निवड झाली आहे.पुढील पिढीतील नैतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक नेतृत्व घडविणाऱ्या प्रतिभावंतांमध्ये इक्षु यांचे नाव अग्रस्थानी असल्याचा संस्थेने गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
गॅरीबे इन्स्टिट्यूटने त्यांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना, “इक्षु विश्लेषणात्मक विचार, समाजउपयोगी दृष्टिकोन आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचे प्रभावी मिश्रण साकारतात. जागतिक पातळीवरील भावी नेतृत्वात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल,” असे नमूद केले.धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इक्षु शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्टता राखली असून सामाजिक जाणिवेतून विविध उपक्रम राबवले आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक काळात त्यांनी मतदार जागृतीसाठी कार्यशाळा आणि रॅल्या आयोजित करून तब्बल ८,००० हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोच साधली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मदत उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थीदशेतूनच प्रकट केली.
शैक्षणिक आणि सामाजिक कामासोबतच इक्षु यांचे कलाविश्वातील योगदानही तितकेच उल्लेखनीय आहे. मागील जवळपास दहा वर्षांपासून त्यांनी भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय व समकालीन नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे. गुरु आदिती भागवत यांच्याकडे जयपूर घराण्याच्या कथ्थक नृत्याची शिकवण तसेच नृत्य दिग्दर्शक Ashley Lobo यांच्या मार्गदर्शनाखाली The Danceworx संस्थेत बॅले, जॅझ आणि हिप-हॉप या प्रकारांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. प्रोफेशनल डान्स सर्टिफिकेशन प्रोग्राम पूर्ण करून त्यांनी अनेक सांस्कृतिक मंचांवर नृत्य सादरीकरणे केली आहेत. विशेष म्हणजे त्या CID–UNESCO या आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेच्या मान्यताप्राप्त सदस्य आहेत.
हा सन्मान स्वीकारताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरच्या वंशातील वारसा लाभलेल्या इक्षु शिंदे यांनी आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या संस्कारांची आणि समाजकारणाची प्रेरणा अधोरेखित केली.गॅरीबे इन्स्टिट्यूटचे आभार मानत, “माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.इक्षु शिंदे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे महाराष्ट्रासह देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भारतातील तरुण प्रतिभावंतांसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरत आहे. भारताच्या उद्याच्या जागतिक नेतृत्वात इक्षु सारख्या विद्यार्थिनींचे तेजस्वी योगदान अधिक उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण करत आहे.
Post a Comment