कोमसाप पुरस्कारकर्त्यांचा पनवेलमध्ये गौरव सोहळा आणि कवी संमेलन संपन्न ...कोमसाप नवीन पनवेल-पनवेल शाखेचे आयोजन ...लोकनेते रामशेठ ठाकूर,सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर,अरुण म्हात्रे,ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख,भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख,माजी उपमहापौर चारुशीला घरत यांची उपस्थिती
पनवेल - हृदयातील भावना म्हणजे साहित्य,कवी-साहित्यिक लिहितात ते खऱ्या अर्थाने हृदयाला भिडत. आयुष्याच्या धकाधकीत मनाला समाधान वाटत असेल तर साहित्यिक कार्यक्रमाला जावे,कवी संमेलनातील शब्दांची मैफिल ही मनाला नवीन ऊर्जा देते असे उद्गार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे काढले.
श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल - पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोमसाप पुरस्कारकर्त्यांचा गौरव सोहळा आणि कवी संमेलन समारंभ प्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
या सोहळ्यास सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर,अरुण म्हात्रे,ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख,भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख,माजी उपमहापौर व जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके उपस्थित होते.
कोमसाप पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष रोहिदास पोटे यांच्या गझलगंधाक्षरी ग्रंथाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रभाकर पाटे स्मृती समीक्षा पुरस्कार,नवीन पनवेल शाखेचे माजी अध्यक्ष प्रा.चंद्रकांत मढवी यांनाही उधळ्या कांदबरीला वि.वा.हडप स्मृती विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल,नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांची केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल व शाखेच्या सदस्या योगिनी वैदू यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल,ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची राज्य शासनाच्या वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिन समितीवर तालुकास्तरीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आणि खोपोली शाखेचे सदस्य डॉ.सुभाष कटकधौंड यांच्या पुन्हा एकदा नव्याने जगायचे मला या एकांकीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा प्रथम क्रमांकाचा रमेश किर पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे म्हणाले ज्या पद्धतीने आजच्या कवी संमेलनामध्ये कविता सादर होतात,अशा सुंदर कवितांमुळे कवींमध्ये मोठा बदल झालेला दिसत आहे.कविता लिहितो,त्यात शब्द असे हवेत की भरून आलं पाहिजे.आपलं जगणं पण गाणं झालं पाहिजे.जगण्याचे गाणे व्हावे ते गाणे सुंदर व्हावे.रामशेठ ठाकूर यांच्यात साहित्याचा अनुबंध राहिला आहे कारण ते शिक्षक होते.मराठीच्या सगळ्या पाठावर पनवेलचे नाव साहित्यिक म्हणून घेतले जाईल असे सांगून पनवेलची सांस्कृतिक जबाबदारी रामशेठ ठाकूर या नावाच्या शिक्षकांनी घेतली आहे. एखादं गाव एखाद्या साहित्यिकाचे कौतुक करतो हा साहित्यिकाचा सन्मानच आहे असे शेवटी सांगितले.ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांनी,साहित्यिकांचे गाव असा पनवेलचा नावलौकिक साहित्यिक वर्तुळात घेतलं गेलं पाहिजे.साहित्य लिहा,पनवेलचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी जेष्ठ कवी अशोक नायगावकर यांचेही भाषण झाले.
यावेळी कविसंमेलन रंगले.सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर,प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांच्यासह उपस्थित कवींनी सादर केलेल्या कवितांनी सभागृह भारावून गेले. सामाजिक वास्तव,मानवी नात्यांची उब, निसर्ग,प्रेम,अनुभवांचे रंग आणि भावविश्वाचे विविध पैलू कवितांमधून खुलून आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले.उपस्थितांचे आभार कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रज्ञा जाधव यांनी केले.
Post a Comment