कळंबोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
पनवेल - कळंबोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती प्रिन्सि थॉमस उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर शाळेच्या बँड पथकाने ध्वजाला सलामी देण्यात आली.बँड पथकाचा आवाज आणि राष्ट्रगीत यामुळे शाळेचा परिसर देशाभिमानाने अधिकच फुलून गेला.
मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या स्वातंत्र्य महोत्सवास अजूनच झळाळी आणली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलांमधून उपस्थितांची मने जिंकली.एका माहितीपटातून विद्यार्थ्यांनी भारतीय ध्वजाचा इतिहास प्रभावीपणे सादर केला.1906 ते 1947 पर्यंतचा भारतीय तिरंग्याचा प्रवास विद्यार्थ्यांनी सुंदरपणे मांडला. एका नाट्यीकरणातून विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय यातून घडलेला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यलढ्यात शांततेच्या मार्गाने जाणारे स्वातंत्र्यवीर आणि इंग्रजांविरुद्ध गोली का जवाब गोली, अशी भूमिका घेणारे स्वातंत्र्यवीर.. जसे नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांचे कार्य विद्यार्थ्यांनी सादर करून जणू स्वातंत्र्यलढाच सर्वांसमोर उभा केला.
देशाभिमान, देशभक्तीपर गीते,नाट्यीकरण, माहितीपट आणि उपस्थितांचा उत्साह असे मंत्रमुग्ध करणारे वातावरण यावेळी पाहायला मिळाले.शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुश्मिता यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना प्रमुख पाहुण्या प्रिन्सि थॉमस, व्यवस्थापिका सिस्टर एलिटा, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे आभार मानले आणि कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांच्या पाठीवर शाब्बासकीची थापही दिली.
Post a Comment