पनवेल महापालिकेची खारघर,पनवेलमध्ये अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई
पनवेल,दि.10 :- पनवेल महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाच्यावतीने गेल्या दोन दिवसापासून खारघर,पनवेलमध्ये अनधिकृतपणे रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फूटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.
पनवेलमधील रायगड बाजार मार्केट यार्ड येथे भाजी खरेदी विक्री करणाऱ्यांची गर्दी कायम असते तसेच नागरिकांची व किरकोळ भाजी विक्रेत्यांची खरेदी करण्यासाठी येजा सुरू असते.अशावेळी रस्त्यांच्या कडेला अनधिकृतरित्या फळ विक्री व भाजी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांमुळे सर्वसामान्यांना चालणे कठिण होऊन जाते.त्यामुळे महापालिकेच्यावतीने अनधिकृत व्यवसायिकांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करवाई करण्यात आली. तसेच मार्केट यार्डमधील रस्त्याच्या कडेला अनधिकृतरित्या बांधलेल्या शेडवर तोडक कारवाई करण्यात आली.
याच पध्दतीने नवीन पनवेलमधील गणेश मार्केट येथे अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यांवरून जाण्यायेण्यास त्रास होत असल्याने आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी अतिक्रमणावरती कडक कारवाई करण्याचे आदेश प्रभाग कार्यालयास दिले होते.त्यानुसार आज दिनांक 10 डिसेंबर रोजी नवीन पनवेलमधील गणेश मार्केट परिसरातील फुटपाथवरील अनधिकृत उभारलेल्या टपऱ्यांवरती अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.
तसेच खारघरमध्ये सेक्टर 19 मध्ये फुटपाथवरील अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवरती ,त्यांच्या शेडवरती अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.प्रभाग समिती क कामोठे अंतर्गत फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले.
पनवेल शहरात रस्त्यांवर तसेच फूटपाथवर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर प्रभाग ड अतिक्रमण विभागाच्यावतीने कडक कारवाई केली जात आहे. फेरीवाल्यांनी रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करू नये अन्यथा येत्या दिवसांमध्ये अशा अतिक्रमणांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात येईल.
डॉ.रूपाली माने,
सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी,
प्रभाग ड
Post a Comment